ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्ररणधुमाळी

“सध्याचं राजकारण दादा कोंडकेंच्या भाषेत सांगायचं झालं तर…”, रोहित पवारांचं ‘ते’ ट्विट चर्चेत

नागपूर | Rohit Pawar – सध्या हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरू असून आज (23 डिसेंबर) या अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. मात्र, काल (22 डिसेंबर) विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानं एकच गदारोळ झाला. त्यानंतर जयंत पाटील यांना निलंबित (Suspension) करण्यात आलं. तसंच या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. तर पाटलांच्या निलंबनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक ट्विट केलं असून त्यांचं हे ट्विट चांगलंच चर्चेत आहे.

रोहित पवार यांनी प्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके (Dada Kondke) यांच्या चित्रपटांच्या नावांचा वापर करून सरकारवर टीका केली आहे. “राज्यातील आजच्या राजकीय परिस्थितीबाबत दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्या चित्रपटांच्या भाषेत बोलायचं झालं तर, ‘मला घेऊन चला’ म्हणून ‘पळवा पळवी’ करत ‘तुमचं आमचं जमलं’ म्हणत ‘सोंगाड्यां’चं राज्य आलं खरं! पण सध्या ‘खोल दे मेरी जुबान’ असं म्हणण्याची वेळ राज्यातल्या सामान्य माणसावर आलीय…”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

रोहित पवार यांनी ‘मला घेऊन चला’ या चित्रपटाचं नाव टाकून शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. शिवसेनेसोबत बंडखोरी केलेल्या आमदारांनी भाजपसोबत जाऊन राज्यात सत्ता स्थापन केली आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. तर ‘पळवा पळवी’ करत ‘तुमचं आमचं जमलं’ म्हणत ‘सोंगाड्यां’चं राज्य आलं खरं हा टोलाही त्यांनी शिंदे गटाला आणि भाजपला लगावला आहे.

शिंदे गट आणि भाजप या पक्षांनी मिळून सत्ता स्थापन केली म्हणून त्यांच्यावर ‘तुमचं आमचं जमलं अशी टीका त्यांनी केली आहे. तर शिवसेनेतून ज्या आमदारांनी बंडखोरी करून मुंबई-सुरत-गुवाहाटी असा प्रवास केला त्यांना दादा कोंडके यांच्या चित्रपटाच्या भाषेत ‘मला घेऊन चला’ या चित्रपटाच्या नावानी त्यांनी टोला लगावला आहे. तर शिंदे गटानं महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली होती. त्या सत्तेला रोहित पवार यांनी ‘सोंगाड्या’च राज्य आलं असं म्हटलं आहे. दरम्यान, रोहित पवारांचं हे ट्विट चांगलंच चर्चेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये