जागतिक फिरकी गोलंदाज शेन वाॅर्नच्या नावानं मिळणार ‘हा’ प्रतिष्ठित पुरस्कार, क्रिकेट बोर्डाचा निर्णय
ऑस्ट्रेलिया | Shane Warne Award – महान फिरकीपटू शेन वाॅर्न (Shane Warne) यांचा ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाकडून अनोखा सन्मान करण्यात येणार आहे. शेन वाॅर्न यांच्या निधनानंतर आता ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानं वॉर्न यांचा एक मोठा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं शेन वॉर्न यांच्या नावानं एक प्रतिष्ठित कसोटी पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. आता कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूचा ‘शेन वॉर्न टेस्ट प्लेयर ऑफ द इयर’ या पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानं घेतला आहे.
सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तसंच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं हा निर्णय घेतला आहे. शेन वॉर्न यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकदा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा हा प्रतिष्ठीत पुरस्कार पटकावला आहे. 2005 च्या ऍशेसमध्ये इंग्लंडविरुद्ध 40 विकेट्स घेतल्यानंतर शेन वॉर्न यांना 2006 मध्ये सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला होता.
तसंच आता वाॅर्न यांच्या नावानं हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जाणार आहे. जागतिक फिरकी गोलंदाज म्हणून प्रसिद्ध असलेले शेन वॉर्न यांनी 4 मार्च 2022 रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांचं दक्षिण थायलंडमधील सामुई बेटावर निधन झालं. मित्रांसोबत सुट्टी घालवण्यासाठी ते थायलंड गेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण क्रीडा विश्वात शोककळा पसरली होती.
शेन वॉर्न यांनी 145 कसोटी सामन्यात 708 विकेट्स घेतल्या आहेत. तर 55 आयपीएल सामन्यात वॉर्न यांनी 57 विकेट मिळवल्या आहेत. 2007 साली त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तसंच वॉर्न यांनी क्रिकेटमधील प्रत्येक फॉर्मेटमध्ये आपली छाप सोडली आहे.