माय लेकराच्या नात्याला कलंक लावणारी घटना, तान्ह्या मुलीला आईनंच तिसऱ्या मजल्यावरून फेकलं
गांधीनगर | Crime News – प्रत्येक आई ही आपल्या मुलांना आपल्या जीवापेक्षाही जास्त जपत असते. पण गुजरातमध्ये माय लेकराच्या नात्याला कलंक लावणारी घटना घडली आहे. एका आईनं आपल्या तीन महिन्यांच्या चिमुरडीला हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं आहे. तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यानं या निष्पाप चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुजरातमधील सिव्हिल रूग्णालयात घडली आहे.
ही धक्कादायक घटना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारीला घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वत:च्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकणारी महिला ही आणंदमधील पेटलाड येथील रहिवासी आहे. फरझानबानू मालेक असं या महिलेचं नाव आहे. या आरोपी महिलेनं पोलिसांना सांगितलं की, तिची तीन महिन्यांची मुलगी अमरीनबानू जन्मापासूनच आजारी होती. ती खूप आजारी असायची. मी तिला दुःखात पाहू शकत नव्हते. त्यामुळे मी हे पाऊल उचललं आहे.
एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, दोन आठवड्यांपूर्वी तीन महिन्यांच्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या मुलीच्या आईनं सुरुवातीला दावा केला होता की, तिचं मूल रुग्णालयातून बेपत्ता झालं आहे. यानंतर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यात आले. फुटेजमध्ये ती आपल्या मुलीसोबत गॅलरीत फिरताना आणि नंतर रिकाम्या हातानं परत येताना दिसत आहे. यानंतर पोलिसांनी आईवर संशय व्यक्त केला. त्यानंतर चौकशीत तिनं तिचा गुन्हा कबूल केला. दरम्यान, 23वर्षीय आईला पोलिसांनी अटक केली आहे.