विवाहीत प्रेयसीला होती लग्नाची हाव, प्रियकरानं केले तिच्यावर चाकूने 35 घाव

टिटवाळा | Titwala Crime News – श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानं (Shraddha Walker Murder Case) संपूर्ण देश हादरला आहे. श्रद्धानं लग्नाचा तगादा लावल्यानंतर संतापलेल्या आफताबनं रागाच्या भरात तिच्या शरीराचे 35 तुकडे केले होते. तेव्हापासूनच देशभरात एकच खळबळ उडाली आहे. तसंच आता असाच काहीसा प्रकार टिटवाळ्यात (Titwala) घडला आहे. एका विवाहीत प्रेयसीनं प्रियकराकडे लग्नासाठी तगादा लावल्यामुळे रागाच्या भरात त्यानं तिच्यावर तब्बल 35 वार करत तिची हत्या केली आहे.
एका विवाहीत महिलेचे एका तरूणाशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून तिनं लग्नासाठी तगादा लावल्यानं प्रियकरानं आपल्या एका मित्राच्या मदतीनं तिची 35 वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना टिटवाळा येथे घडली आहे. मयत महिला रुपांजली जाधव ही पुणे येथे राहत होती. तिचा टिटवाळ्यात मृतदेह आढळून आल्यानंतर आधार कार्डच्या सहाय्यानं तिची पोलिसांनी ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी तिची हत्या करणारा प्रियकर जयराज चौरेसह त्याचा मित्र सूरज घाटे या दोघांनाही अटक केली आहे.
रुपांजली जाधव ही महिला विवाहित असून तिला तीन मुलं आहेत. रूपांजलीचे दोन वर्षांपासून पुण्यात राहणाऱ्या जयराज चौरे या तरूणाशी प्रेमसंबंध होते. त्यानंतर रुपांजलीनं जयराजकडे लग्नासाठी तगादा लावत ती त्याला ब्लॅकमेल करत होती. त्यामुळे जयराजनं संतापून रुपांजलीला संपवण्याचा निर्णय घेतला. जयराजनं रूपांजलीला दागिने घेऊन देतो, असं सांगत तिला टिटवाळा येथे घेऊन आला. जयराज आणि त्याचा मित्र सुरज घाटे यांनी टिटवाळा येथील गोवेली परिसरात रुपांजलीवर धारदार शस्त्रानं वार करत तिची हत्या केली. जयराजनं रुपांजलीचा काटा काढण्यासाठी मित्रासोबत तिच्या हत्येचा कट रचला होता. दरम्यान, टिटवाळा पोलिसांनी आरोपी जयराज आणि त्याचा मित्र सूरज या दोघांना अटक केली आहे.