साहेब मी गद्दार नाही… राऊत बंधुंनी सामनात छापलेली ही जाहिरात व्हायरल होतेय
मुंबई | बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांनी दिलेल्या सामनातील जाहिरातीची चर्चा सर्वत्र रंगताना दिसत आहे. त्या जाहिरातीत “साहेब मी गद्दार नाही…” असा मजकूर ठळक अक्षरात छापलेला आहे. त्या मजकूरासोबत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो छापण्यात आला आहे. राऊत बंधुंनी या जाहिरातीच्या माध्यमातून शिंदे गटावर निशाणा साधल्याने आता शिंदे गट त्यावर काय प्रतिक्रिया देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या जयंती आहे. राऊत बंधुंनी ‘सामना’च्या मुखपृष्ठावर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणारी एक जाहिरात दिली आहे. या जाहिरातीत आणखीही मजकूर छापण्यात आला आहे. गेलेल्या 40 गद्दारांना गाडून त्याच उमेदीने उभे राहू. तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने अभिवादन केले याचे समाधान आमच्या सारख्या शिवसैनिकांना होईल. जय हिंद… जय महाराष्ट्र, असा निर्धारच संजय राऊत आणि सुनील राऊत यांनी जाहिरातीतून व्यक्त केला आहे.