देश - विदेश

शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरेंची की, एकनाथ शिंदेंची! उद्याचा दिवस ठरणार महत्त्वाचा

मुंबई : (Uddhav Thackeray will resign as party chief) उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख पदाची मुदत उद्या म्हणजेच २३ जानेवारीला संपत आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे खरंच शिवसेना पक्षप्रमुखपद सोडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच शिवसेना पक्ष कोणाचा असा वाद निवडणूक आयोगात आणि न्यायालयात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या कार्याध्यक्षपदाबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. २३ जानेवारी, २०२३ ही तारीख शिवसेना पक्षासाठी अत्यंत महत्वाची आहे.

विशेष म्हणजे उद्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची जयंतीही आहे. आणि याच तारखेला उद्धव ठाकरेंचा पक्षप्रमुख म्हणून आणि राष्ट्रीय कार्यकारणीचीही मुदत संपतेय. त्यामुळे नेता निवडीसाठी प्रतिनिधी सभा घेण्याची मागणी ठाकरे गटाकडून अर्जाद्वारे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. पण त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगानं काहीही स्पष्ट केलेलं नाही. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिवशी आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेणार असल्याचं कळतंय. केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात कुठलाही निर्णय न झाल्यानं ठाकरे गटानं हा निर्णय घेतल्याचं समजतंय.

जोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयातून बंडखोर आमदारांच्या अपात्रतेविषयी निर्णय येत नाही तोपर्यंत शिवसेनेतल्या पक्षप्रमुख पदाचा, पक्ष नेमका कुणाचा आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचं हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. त्यातच उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुखपदाचा कार्यकाल उद्या संपतोय. त्यामुळेच आता शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी कोण बसणार? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे हा प्रश्न विचारला जात आहे. निवडणूक आयोगानं २० जानेवारीच्या सुनावणीत निकाल दिला असता तर हा पेचच निर्माण झाला नसता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये