तुर्कस्तानमध्ये मृतांचा आकडा 5000 पार; भूकंपाचे दाहक फोटो पाहून तुम्हालाही हळहळ वाटेल

Turkey Syria Earthquake : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये काल (सोमवार) स्थानिक सकाळी 4:17 वाजता भूकंपाचे तीव्र धक्के बसले. 5.9 मॅग्निट्यूडच्या या भूकंपाच्या धक्क्यांनी तुर्कस्तानासह मध्यपूर्वेतील अनेक देश हादरले आहेत. या भूकंपात तुर्कस्तान आणि सीरियामध्ये तब्बल 5000 हून अधिक लोक मरण पावले, तर हजारो लोक जखमी झाले. भूकंपामुळे हजारो इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कारण बचावकर्ते अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहेत.

अजूनही तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत. शक्तिशाली भूकंपानंतर आतापर्यंत 100 हून अधिक आफ्टरशॉक बसले आहेत. इथल्या भयंकर विध्वंसाने लोक भयभीत झाले आहेत. फोटो पाहून हा विध्वंस किती मोठा होता याची तुम्ही कल्पना करू शकता.

तुर्कस्तानमधील हाते येथे कोसळलेल्या इमारतींचे हवाई दृश्य. यात संकट किती मोठं आहे, याची कल्पना येते. सर्व घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

विवादित तुर्की-सीरियन प्रांत हातेमध्ये आपत्कालीन कर्मचारी ढिगाऱ्यातून वाचलेल्यांचा शोध घेत आहेत. जखमींच्या श्वासोच्छवासाच्या आवाजावरून ते कुठे दबले आहेत का? हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

सोमवारी पहाटेच्या आधी झालेल्या भूकंप आणि आफ्टरशॉकमधील मृतांची संख्या वाढू शकते अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कारण बचावकर्त्यांनी मंगळवारी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध सुरू ठेवला आहे. देशात शोककळा पसरली आहे.