“अमित शाह उपग्रहाद्वारे ईव्हीएम नियंत्रित करतात” – चंद्रकांत खैरे

गडचिरोली | उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार राज्यभर शिवगर्जना अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान सत्ताधाऱ्यांचे षडयंत्र जनतेसमोर मांडण्यासाठी राबवण्यात येत आहे. यादरम्यान ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे विदर्भातील चार जिल्ह्यांत फिरणार असल्याची माहिती मिळाली. यावेळी गडचिरोली येथे पत्रकारांशी संवाद साधताना खैरेंनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.
यावेळी बोलताना खैरे म्हणाले, भाजपाला देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत. यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह स्वतः उपग्रहाच्या माध्यमातून ‘ईव्हीएम’ नियंत्रित करत आहेत. त्यांनी या कामासाठी माणसे ठेवली असून त्यातीलच एकाने मला ही गोपनीय माहिती दिली, असा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
खैरे पुढे म्हणाले, यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात याव्या. निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष वादात नुकतीच जी भूमिका घेतली ती संशयास्पद आहे. त्यामुळे भाजपा सर्वच यंत्रणांचा हवा तसा वापर करत आहे, हे सिद्ध होते. प्रादेशिक पक्षांना संपवण्यासाठी पैशांचा सर्रास वापर सुरू आहे. जे विकले नाही त्यांच्या मागे ईडी, आयकर विभागासारख्या संस्थांना लावले जात आहे. सुडाच्या भावनेतून तुरुंगात डांबले जात आहे. महागाई, रोजगारासारखे मुद्दे बाजुला करून देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे कामदेखील सुरू आहे. हा सर्व प्रकार जनतेच्या लक्षात आला असून, निष्पक्ष निवडणुका झाल्यास भाजपला घरी जावे लागेल. त्यासाठी मतदान ईव्हीएम यंत्राऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात यावे, अशी मागणी खैरे यांनी केली.