ताज्या बातम्यापिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्ररणधुमाळीसिटी अपडेट्स

“मतदानाच्या दोन दिवस आधी सत्ताधाऱ्यांनी…”, पराभवानंतर नाना काटेंचा खुलासा

पिंपरी चिंचवड | Chinchawad Bypoll Result – पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा विजय झाला आहे. धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा तब्बल 10 हजार मतांनी पराभव केला आहे. गेल्या 28 वर्षांपासून भाजपच्या हातात असलेला हा मतदारसंघ आता मविआने ताब्यात घेतला आहे. त्यामुळे कसब्यात भाजपला पराभवाचा मोठा फटका बसला आहे. मात्र, पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchawad Bypoll Result) भाजपला अपेक्षित यश मिळालं आहे.

भाजपनं (BJP) पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली. मात्र, निवडणूक लढवण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम असल्यानं निवडणूक पार पडली. तसंच, राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीवरून बंडखोरी झाल्यामुळे ही तिरंगी लढत झाल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये अश्विनी जगताप यांचा 36,091 मतांनी विजय झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटेंचा (Nana Kate) पराभव झाला आहे. यानंतर काटेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

नाना काटे म्हणाले की, “प्रत्येक मतदारापर्यंत सगळे कार्यकर्ते पोहोचले. पण बंडखोरीचा फटका नक्कीच बसलाय. कारण कलाटेंना झालेलं मतदान मविआचंच आहे. त्यातील काही मतं वंचित बहुजन आघाडीची असू शकतात. सत्ताधाऱ्यांनी मतदान होण्याच्या दोन दिवस आधी आमचे बरेच कार्यकर्ते पोलीस बळ वापरून उचलले होते. त्यानंतर इथे पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला.”

“संपूर्ण चिंचवड मतदारसंघात सर्व कार्यकर्ते पुन्हा काम करतील. तसंच आम्ही जोमानं काम करू. जर सहानुभूती असती तर पैसे वाटलेच नसते. त्यांना पराभवाची भीती होती म्हणून त्यांनी पैसे वाटले”, असंही नाना काटे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये