मार्केटला पुन्हा हादरे; सेन्सेक्स-निफ्टीची घसरगुंडी, गुंतवणूकदारांना ६.६ लाख कोटींचा फटका
नवी दिल्ली : बाजाराची सुरुवात तेजीच्या ट्रेंडने झाली पण जसजसे ट्रेडिंग सत्र पुढे सरकत गेले तसतसे बाजारातील अस्थिरता वाढत गेली आणि शेवटी बाजारात मोठी घसरण झाली. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स, निफ्टी १.५ टक्क्यांपेक्षा जास्त घसरून बंद झाले. बीएसईवरील सर्व क्षेत्रीय निर्देशांकांवर विक्रीचे वर्चस्व असताना निफ्टी पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.
आजच्या व्यवहारात इन्फ्रा, आयटी, एफएमसीजी शेअर्सवर दबाव दिसून आला. मेटल, फार्मा, एनर्जी, बँकिंग, ऑटो, रियल्टी शेअर्समध्ये विक्री दिसून आली. स्मॉल-कॅप शेअर्सवरही आज विक्रीचा दबाव दिसून आला आणि मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्स घसरले. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक आज १.८२ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक २.०८ टक्क्यांनी घसरला.
आजच्या व्यवहाराअंती सेन्सेक्स ८९७.२८ अंकांनी किंवा १.५२ टक्क्यांनी घसरून ५८,२३७.८५ वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी २५८.६० अंकांच्या म्हणजेच १.४९ टक्के घसरणीसह १७,१५४.३० वर बंद झाला. आजच्या व्यवहारात इंडसइंड बँक, एसबीआय, टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स आणि आयशर मोटर्स हे निफ्टी घसरले. तर टेक महिंद्रा, अपोलो हॉस्पिटल्स, ओएनजीसी आणि एचयूएल हे शेअर्स वधारलेले होते.
गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे सुमारे ६.६ लाख कोटींचे नुकसान झाले असून या दरम्यान, सेन्सेक्स २००० हून अधिक अंकांनी घसरला आहे. केवळ सोमवारीच गुंतवणूकदारांचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप २५८.९५ लाख कोटी रुपयांवर घसरले. गेल्या शुक्रवारी ते २६२ लाख कोटी रुपये होते.