अखेर सत्याचा विजय : सिंहगडला तातडीने वापर परवाना देण्याचे सर्वोच्च आदेश

सोलापूर : केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्युटच्या (sinhagad Institute Kegao) सर्व इमारतींना १५ दिवसांत बांधकाम परवानगी व त्या इमारती वापर करण्याची परवानगी देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोलापूर महानगरपालिकेला दिले. बारा वर्षानंतर अखेर सत्याचा विजय झाला, अशी माहिती सिंहगड इन्स्टिट्युट सोलापूरचे सचिव संजय नवले (Sanjay Navale) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या बेकायदेशीर इमारतीसंदर्भात मंगळवारी दि. २४ एप्रिल रोजी अंतिम सुनावणी पूर्ण झाली. यामध्ये सोलापूर सिंहगड इन्स्टिट्युट च्या बाजूने निकाल देताना सदर इमारतींना नियमितता देऊन १५ दिवसांत सर्व इमारतींना वापर परवाना देण्याचे आदेश सोलापूर महापालिकेस सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कृष्णा मुरारी व संजय कुमार यांनी हा निकाल दिला आहे, असे सचिव संजय नवले यांनी सांगितले.सन २०११ मध्ये सिंहगड इन्स्टिटयूटने मनपाकडून मंजूर झालेल्या ले-आऊट प्रमाणे नवीन इमारत बांधकाम परवानगीसाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यानंतर इमारत बांधकामांना सुरुवात केली होती. दाखल केलेल्या प्रस्तावास मनपाकडून विहित कालावधीत मंजूरीबाबत न कळविल्याने त्यास परवानगी मिळाली आहे असे गृहीत धरून बांधकामे पूर्ण केली.
दरम्यान तक्कालीन मनमा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सदर इमारतींना बांधकाम परवाना देता येणार नाही व या इमारती पाडकामाचे आदेश दिले होते. तत्कालीन मनपा आयुक्त चंद्रकांत गुंडेवार व त्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे संस्थेस जाणिवपूर्वक टार्गेट करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला होता.
वास्तविक सोलापूर जिल्ह्यात सिंहगड संस्थेचा वाढता नावलौकिक, लोकप्रियता, उत्कृष्ट निकाल, उत्कृष्ट प्लेसमेंट या सुविधा देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुण्याच्या धर्तीवर शिक्षण देण्याचे उत्कृष्ट काम सिंहगड संस्था करीत आहे. या संस्थेला जाणीव पूर्वक बदनाम करण्याचे काम काही राजकीय लोक करत आहेत, असा आरोपही सचिव संजय नवले यांनी यावेळी केला.
सोलापूर जिल्ह्यातील गोर-गरीब मुलांना पुण्याच्या धर्तीवर दिले. जाणारे तांत्रिक शिक्षण हे सोलापूर जिल्ह्यातील मुलांना घेता यावे यासाठी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडल संचलित सिंहगड इन्स्टिट्युट नावे संस्था उभी करून प्रा. एम. एन. नवले यांनी ज्ञानमंदिर उभे केले. या ज्ञानमंदिरातुन आज असंख्य विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडत आहेत. या संस्थेची शैक्षणिक क्षेत्रातील वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन बदनामी करण्याचे प्रयत्न अनेकांकडून होत असल्याचे त्यांनी सांगितले.