“आत्मचरित्र नाही, पण आत्मा विकला असेल”, उद्धव ठाकरेंची नारायण राणेंवर खोचक टोला

रत्नागिरी : (Uddhav Thackeray On Narayan Rane) राजापुरातील प्रस्तावित बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून कोकणात घमासान सुरू आहे. राजकीय समर्थक आणि विरोधक आमने सामने आले आहेत. आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बारसू येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. तसंच, कातळशिल्प येथेही ऐतिहासिक वास्तूला भेट दिली. त्यानंतर, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचं आत्मचरित्र वाचून दाखवलं. ज्यात नारायण राणे यांनी कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला होता.
विनायक राऊत म्हणाले की, नारायण राणेंनी याच आत्मचरित्रामध्ये रिफायनरी प्रकल्पाविरोधात जी वाक्य लिहिली होती ती वाचून दाखवतो. मागच्या चार वर्षातील हे आत्मचरित्र आहे. माझा राजकीय पाठिंबा कोणालाही असो. पण रिफायनरी प्रकल्पाचा मी कडवा विरोधक आहे, कडवा विरोधक राहणारच आहे, असं नारायण राणेंनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं असल्याचा दाखला राऊत यांनी यावेळी दिली.
विनायक राऊत आत्मचरित्रातील हा उतारा वाचत असतानाच उद्धव ठाकरेंनी मध्येच त्यांना अडवत, “नारायण राणेंनी कदाचित आत्मचरित्र नाही तर आत्मा विकला असावा”, असा खोचक टोला राणेंना लगावला. त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. हा विनाशकारी प्रकल्प झाला तर, सहा हजार हेक्टर म्हणजे १५ हजार एकर जमीन जाणार आहे.
आंब्याची किमान १५ ते २० लाख झाडे तोडली जाणार आहेत. ७ ते १० लाख काजूची झाडं जाणार. ७०० हेक्टर जमिनीवरील शेती नष्ट होणार आहे. २५ हजार लोक विस्तापित होणार आहेत, असं नारायण राणेंनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलं आहे, असं विनायक राऊत म्हणाले. “आता त्याच रिफायनरीसाठी दलाली करण्याची सुरुवात होत असताना ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त समर्थकांचा मोर्चा लावण्याचं काम राणेंनी केलं आहे, असंही राऊत म्हणाले.