दोन हजारांच्या नोटा वितरणातून काढल्या; अजित पवार म्हणाले, “याला काय अर्थ आहे…”

कोल्हापूर | Ajit Pawar – केंद्र सरकारनं दोन हजारांच्या नोटा वितरणातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारनं घेतलेल्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून टीका केली जात आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. काल फतवा काढला की दोन हजार रूपयांची नोट बंद. याला काय अर्थ राहिला आहे का? असं अजित पवार म्हणाले. ते आज (20 मे) कोल्हापूरमध्ये असून यावेळी केलेल्या भाषणात ते बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, सरकारनं मागे एकदा सांगितलं होतं की पाचशे आणि हजाराची नोट बंद. तर आता काल फतवा काढला की दोन हजार रूपयांची नोट बंद. याला काही अर्थ राहिला आहे का? दोन हजारांच्या नोटा आता द्यायच्या आणि बदलून घ्यायच्या. आपल्या देशानं इंदिरा गांधीचा, वाजपेयींचा काळ पाहिला आहे. नरेंद्र मोदींच्या अगोदर मनमोहन सिंह पंतप्रधान होते आपण तोही काळही पाहिला आहे.
काही निर्णय हे राज्यकर्ते म्हणून घ्यावे लागतात. बनावट, नकली नोटा किंवा बाहेरच्या लोकांनी चलन अडचणीत आणायचा प्रयत्न केला तर असे बदल करावे लागतात, याबद्दल दुमत नाही. पण हे सारखं सारखं का करावं लागतं आहे? याचा सरकारनं अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे, असं म्हणत अजित पवारांनी मोदी सरकारवर टीका केली.