कर्नाटकच्या शपथविधीला ममतांपाठोपाठ उद्धव ठाकरेंचीही अनुपस्थितीत; चर्चेला उधाण…

बंगळुरू : (Karnataka CM Swearing In Ceremony) कर्नाटकात काँग्रेसच्या (Congress) विजयानंतर आज कर्नाटकात सिद्धरामय्या (Siddaramaiah) मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेतील. तसेच डीके शिवकुमार (DK Shivakumar) हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. या शपथविधीला देशभरातील राजकीय नेते उपस्थित राहिले आहेत. परंतु शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) या शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत. तर शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून राज्यसभा खासदार अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी उपस्थित राहणार आहेत. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान, या शपथविधीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, देखील उपस्थित होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील मित्रपक्ष म्हणून काँग्रेसकडून विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना शपथविधीसाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वत: उद्ध ठाकरे यांना फोन करुन निमंत्रण दिलं होतं. परंतु उद्धव ठाकरे शपथविधीला हजर राहिले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
या शपथविधी सोहळ्यामुळे केंद्रातील सत्ताधारी पक्षाला विरोधकांची मूठ किती घट्ट आहे याचा अंदाज आला असता असं म्हटलं जात आहे. तसेच सत्ताधारी पक्षाला एक वेगळा संदेश गेला असता अशी देखील चर्चा रंगली आहे. परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे विरोधकांमध्ये सगळं आलबेल सुरु आहे ना असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.