अग्रलेखताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळीसंपादकीय

मौनं सर्वार्थ साधनम्

एक तर अत्यंत आत्मविश्वास आणि सुयोग्य नियोजन असणारी किंवा बेछूट, अविचारी असणारी व्यक्तीच असे काही लिहू वा बोलू शकते. राऊतांची वर्गवारी करण्यात अर्थ नाही. मात्र देशापुढे अनेक प्रश्न कायमच असतात. त्यातल्या एखाद्या प्रश्नावर मनापासून काम करावे. प्रश्न मांडताना त्याला संभाव्य उत्तर किंवा उपाय सांगावेत.

यापूर्वीही अनेकदा आम्ही राज्यातील काही राजकीय मंडळींच्या बोलण्याकडे एकदा लक्ष द्यावे यावर लिहिले आहे. ही नेतेमंडळी पक्षाचे प्रवक्ते असल्याने त्यांना सदैव बोलले किंवा लिहिलेच पाहिजे असे वाटत असते. मालाचे उत्पादन अनियंत्रित झाले की, उत्पादन कमी दर्जाचे होते. दररोज आणि सगळ्या विषयांवर बोलल्याने ती व्यक्ती शहाणीसुरती आहे असा समज जनतेचा होतो, असे प्रवक्त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. त्यातून स्वतःबद्दल, आपल्या पक्षाबद्दल नक्कीच अभिमान असावा. मात्र विश्वास आणि फाजील आत्मविश्वास यातला फरक या मंडळींनी ओळखला पाहिजे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) हा विषय किंवा त्यांच्या मतावर लिहिणे हा विषय आमच्या लेखी अदखलपात्र आहे.

मात्र संजय राऊत नेते आहेत. एका वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत आणि ते जे काही लिहितात ते ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने असते. त्यामुळे त्यांच्या लेखाची वा बोलण्याची दखल घ्यावी लागते. दखल ठाकरे यांची असते, राऊतांची नसते. पंतप्रधान मोदी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत होतील का? भाजप सत्तेतून परास्त होईल का, अशी भाबडी शंका म्हणे एनडीएच्या सदस्याने तो दिल्ली आणि राऊत बंग‍‍ळुरूला जाताना विचारली. आता त्यांचे नाव सांगणे शक्य नाही. का तर ते अडचणीत यायला नकोत. म्हणजे राऊत यांना आपल्या हिशेबाने पटकथा लेखन करणे सोपे.

बरं हॉटेल, विमानतळ या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था आणि तपासी यंत्रणा इतक्या असतात की, राऊत यांनी त्या व्यक्तीचे नाव सांगितले नाही तरी सहज समजू शकते. यापुढे ती व्यक्ती राऊत यांना मोदी यांच्या पराभवाच्या गप्पा जाताजाता मारेल असे वाटत नाही आणि त्यातून तो अशा गप्पा मारत असेल तर ती व्यक्ती राऊत यांच्याबरोबर गांभीर्याने बोलण्यास तयार नाही. सहज राऊत यांना हवा मारून, फिरकी घेऊन ती व्यक्ती पुढे निघून गेली. मात्र राऊत यांना गांभीर्याने कोणीच घेत नसल्याने बोलणारा आणि जे बोलले ते महत्त्वाचे आहे असे समजून घेऊन राऊत त्याला वजन देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

लोकशाहीच्या मोजमापाचे निदान निवडून येणाऱ्या व्यक्तीवर होते. जनता कोणाला मत देते, कोणाला सत्ता स्थापन करायला सांगते हा मुद्दा महत्त्वाचा असतो. जनमताचा २०२४ सालचा कौल राऊत ठामपणे कसा देतात हे समजायला मार्ग नाही. सत्तेत आल्यावर काय करणार याचा त्यांच्यासह कथित इंडिया या राजकीय समूहाचा विचार काय हे माहीत नाही. त्यापुढे जाऊन ही इंडियन मंडळी देशप्रेमी आणि मोदींच्या बरोबरची देशद्रोही. इंडियन बरोबरची लोकशाही तत्त्वे पाळणारी आणि मोदींबरोबरची हुकूमशाही मानणारी हे कोणते सूत्र हे पण कळण्यास वाव नाही. भांगेसारखे अमली पदार्थ विचारांना मोकळेपणा देतात.

मनोरंजन आणि स्वप्नरंजन करतात. मात्र असे काही न करता हवेत पतंग उडवायचे आणि ते आपले मुखपत्र असणाऱ्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करायचे याला असामान्य धाडस लागते. एक तर अत्यंत आत्मविश्वास आणि सुयोग्य नियोजन असणारी किंवा बेछूट, अविचारी असणारी व्यक्तीच असे काही लिहू वा बोलू शकते. राऊतांची वर्गवारी करण्यात अर्थ नाही. मात्र देशापुढे अनेक प्रश्न कायमच असतात. त्यातल्या एखाद्या प्रश्नावर मनापासून काम करावे. प्रश्न मांडताना त्याला संभाव्य उत्तर किंवा उपाय सांगावेत. देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या सभागृहात आपल्याला बसायला मिळाले आहे. त्याचा सदुपयोग करता येत नसेल तर किमान दुरुपयोग तरी करू नये. मौनं सर्वार्थ साधनम् हे तरी लक्षात ठेवावे. प्रश्न मांडताना त्याला संभाव्य उत्तर किंवा उपाय सांगावेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये