‘मराठा आरक्षण हाच माझा उपचार’; जरांगेंचं सर्वपक्षीय बैठकीपूर्वी राज्यातील नेत्यांना आवाहन..

मुंबई : (Jarange Patil On Political Leaders) मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषणाचा आज १४ वा दिवस सुरू आहे. जरांगे पाटील यांनी कालपासून पाणी पिणं अन् औषध घेणंही बंद केलं आहे. मागील काही दिवसांपासून सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये अनेक चर्चा आणि बैठका पार पडल्या मात्र, यामध्ये कोणताच तोडगा निघाला नाही.
मनोज जरांगे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. सरकारकडून मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे, मात्र, त्यांच्या मागण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने जरांगे पाटील यांनी आपण उपोषण मागे घेणार नसल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण हाच माझ्यासाठी उपचार असेल असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.
आम्हाला आरक्षण पाहीजे आणि ते ही महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र हवं आहे. हे भीजत घोंगडं ठेवू नका, तुम्हाला जे काही करायचं ते करा असं अवाहन जरांगे यांनी सर्व पक्षांना केलं.