राज्यात चमत्कार घडणार? “…तर अजित पवार हे मुख्यमंत्रीही होऊ शकतात”; रवी राणांचा दावा
अमरावती : (Ravi Rana On Ajit Pawar) महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ पासून कधी काय होईल याचा नेम कोणीच सांगू शकत नाही. २०१९ साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना सोबत घेत ७८ तासांचे सरकार बनवले. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येत मविआ सरकार बनवले. अडीच वर्षांनी शिवसेनेशी बंडखोरी करत एकनाथ शिंदेनी भाजपच्या मदतीने नवं सरकार स्थापन केल. वर्षभरानंतर अजित पवार गट राष्ट्रवादीची फारकत घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला.
दरम्यान, आता भाजप समर्थक अपक्ष आमदार रणी राणा यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, केंद्रात मोदी सरकार अन् नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून अजित पवार जसे सरकारमध्ये सहभागी झाले त्याचपद्धतीने शरद पवार हे मोदींना पाठिंबा देतील असं साकडे मी लालबागच्या राजाला घातले होते. राज्य अन् केंद्रातील विकासकामांना पवार साथ देतील.
गेल्या १० दिवस मी घरगुती आणि सार्वजनिक गणपतीला आराधना केली. येणाऱ्या १५-२० दिवसांत चमत्कार होईल आणि शरद पवार हे मोदींना पाठिंबा देतील असा विश्वास मला वाटतो. राज्यात आणि केंद्रातील सरकार शरद पवारांच्या मदतीने मजबूत होईल आणि राज्य, केंद्राचा विकास जोमाने होईल असंही राणा म्हणाले. त्यामुळे राज्यातील राजकारणाला उधाण आलं आहे.
पुढे ते म्हणाले, राजकारणात कुठलीही गोष्ट शक्य आहे. जर १५ दिवसांत शरद पवार मोदी सरकारसोबत आले तर अजित पवार हे मुख्यमंत्रीही होऊ शकतात, राणा यांच्या याच वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.