उद्धव ठाकरे तुम्हाला सुमंत रुईकर आठवतोय का? राऊतांच्या रेड्याच्या टीकेनंतर भाजपचा घणाघात
मुंबई | महाराष्ट्रामध्ये यमाचा रेडा फिरतोय. त्यावर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री स्वार झाले आहेत. महाराष्ट्रात 100 हून अधिक मृत्यू झालेयत पण मुख्यमंत्र्यांना त्याचे दु:ख नाही, असं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलंय. त्यांच्या या वक्तव्याला भाजपने सडेतोड उत्तर दिलं आहे.
भाजपची प्रतिक्रिया
भाजपने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे त्यात म्हटलंय ‘महाराष्ट्रात एक यमाचा रेडा फिरतोय आणि त्यावर एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री स्वार झाले आहेत, असे संजय राऊत आज म्हणाले. राऊत, तुमच्या जिभेला हाड नाही, हे तुम्ही वरचेवर सिद्ध केलेच आहे.. पण आज तुम्हाला संवेदनाही नाहीत हेही दाखवून दिले. कधी तुमच्या मालकाला विचारा. त्यांना बीडचा सुमंत रुईकर आठवतो का?तो आठवा!! म्हणजे तुमचे आजचे वाक्य तुमच्याच कानफटात कसे वाजते त्याचा आवाज आठवा’
‘सुमंत आठवला की त्याचा अकाली मृत्यू आठवा, त्याच्या मृत्यूनंतर तुम्ही वाऱ्यावर सोडलेले त्याचे कुटुंब आठवा…त्यांची पत्नी कीर्ती काय म्हणाली तेही आठवा. सगळं आठवून झाले की आजचा रेडा आठवा.. आणि तुमच्या मालकाचे प्रताप आठवा. तुमचे मालक उद्धव ठाकरे यांची मणक्याची शस्त्रक्रिया नीट होऊन त्यांना दीर्घायुष्य लाभू दे, मी बीड ते तिरूपती पायी चालत दर्शनाला येईन असे साकडे बालाजीला सुमंत रुईकरने घातले होते. उध्दव ठाकरे ठणठणीत झाल्यावर आपले वचन पूर्ण करण्यासाठी बीडहून 1100 किमी पायी निघालेल्या सुमंतचा कर्नाटकात मृत्यु झाला…
आणि, त्यानंतर तुम्ही आणि तुमचे मालक सुमंतला विसरले. त्यांची पत्नी कीर्ती म्हणाली, ज्या ठाकरेंच्या दीर्घायुष्याची कामना करण्यासाठी तिच्या नवऱ्याने जीव दिला. त्याच्या मृत्युनंतर दहा दिवसांत ठाकरे कुटुंबातील कोणीही सुमंतच्या परिवाराशी संपर्क केला नाही. त्यानंतरही दीड वर्षे ठाकरे कुटुंबातील कुणीच बोलले नाही, भेटले नाहीत. साधी विचारपूसही केली नाही.. माझ्या नवऱ्याचे बलिदान व्यर्थ गेले..!!!
लक्षात आले का राऊत रेडा कोण घेवून फिरते? पक्ष नावाचे कुटुंब वाऱ्यावर सोडून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी…’ इतकेच तुम्हांला आणि तुमच्या मालकाला ठावूक आहे. सद्या पितृपक्ष सुरू आहे. पूर्वजांचे कर्तुत्व तुम्ही विरसलेच आहात. या पंधरवड्यात त्यांचे स्मरण करा. कशाला यमाचे नाव काढता?
असा घणाघाती हल्ला भाजपने संजय राऊत यांच्यावर केला आहे.