कट्टर वैरी झाले एक, मतदारांनीच ठोकली मेख! महाडिक-पाटील पॅनलला अपक्षांनी चारली धूळ
कोल्हापूर : (Grampanchyat Election 2023) ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये यावेळी वेगळंच चित्र बघायला मिळालं. राजकारणात पक्के वैरी असलेले काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि भाजप खासदार धनंजय महाडिक यांचा एकत्रित पॅनल होता. परंतु चिंचवाड गावच्या लोकांनी या पॅनलला धूळ चारत अपक्षांच्या हाती सत्तेची सूत्र दिली आहे.
कोल्हापूरच्या चिंचवाड ग्रामपंचायतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. या निवडणुकीत मतदारांनी सत्ताधाऱ्यांना नाकारत अपक्षांना साथ दिली. आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या पॅनलचा पराभव झाला असून 10 विरुद्ध 3 असा निकाल लागत श्रद्धा प्रशांत पोतदार या अपक्ष उमेदवार सरपंचपदी निवडून आल्या आहेत.
करवीर तालुक्यातील चिंचवाड या गावात काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित पॅनल उभा केला होता. यंदाही महाडिक-पाटील पॅनलची सत्ता यावी यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले होते. परंतु तीच मंडळी आणि त्यांच्या कारभाराला कंटाळलेल्या गावकऱ्यांनी तरुणांचं अपक्ष पॅनल उभं केलं. थेट जिल्ह्याचे नेते खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या विरोधातच शड्डू ठोकण्यात आला.
सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यात वाद निर्माण झाल्याने हे दोघेही कोल्हापूरच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर वैरी झालेले आहेत. परंतु सत्तेसाठी स्थानिक कार्य़कर्त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मात्र या पुढार्यांना चिंचवाडमधील जनता कंटाळली आणि त्यांनी सर्वसामान्य अपक्ष उमेदवारांना कौल दिला.