सिंहगडावरील वाहतूक कोंडीबाबत वनविभागाचा मोठा निर्णय; काय आहे? घ्या जाणून

पुणे- सिंहगड घाटातील वाहतुकीचे नियोजन घेरा सिंहगड वनसंरक्षण समिती करते. समितीकडून त्याबाबत वेळेत योग्य निर्णय न घेतल्याने अभूतपूर्व वाहतूक कोंडी नुकतीच झाली होती. यामुळे वन विभाग खडबडून जागे झाले. त्यांनी सुरळीत वाहतुकीसाठी घाटातील वाहतूकीच्या व्यवस्थापनात बदल करण्याच्या सूचना वन समितीला दिल्या आहेत.
सिंहगडावर पर्यटकांची वाढती गर्दी पाहता सुट्टीच्या दिवशी घाटामध्ये शेवटच्या टप्प्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वन विभागाने गडावर सोडण्यात येणारी वाहतूक टप्प्याटप्प्याने सोडण्याचे नियोजन करीत आहे. याबाबत वन विभागाने घेरा सिंहगड वन व्यवस्थापन समितीला सूचना केल्या आहेत. सिंहगड घाटातील शेवटच्या तीन किलोमीटर मध्ये रविवारी नियोजन फसल्याने सुमारे चार तासाहून अधिक काळ गड वाहतुकीसाठी बंद होता. तसेच सोमवारी सुट्टी असल्याने गर्दी झाली होती. परिणामी वाहतूक कोंडी झाली होती.
हेही वाचा- आषाढी वारीसाठी ‘लालपरी’ सज्ज; पुणे विभागातून तब्बल ‘एवढ्या’ बसेस सोडणार
रविवारी वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल झाले. जास्तीत जास्त पर्यटकांना गडावर जाता यावे. तसेच वाहतूक कोंडी टाळून सिंहगडावर जाता येईल. यासाठी समिती नियोजन करीत आहे. सिंहगडावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांसाठी वेळापत्रक तयार करण्यात येईल. गडावर जाणारी वाहने कोंढणपूर नाका येथे वाहने थांबविणार. त्याचवेळी गडावरील वाहन तळावरून वाहने खाली येतील. कोंढणपूर नाका येथून वाहने गडावर सोडल्यावर वाहन तळावरून एक ही वाहन खाली येणार नाही. असा प्रयोग करण्यात येणार आहे. अशा सूचना वन विभागाने वन समितीला केल्या आहेत.
हेही वाचा- सावधान! मान्सूनच्या सुरुवातीलाच पुण्यात लहान मुलांना टायफॉईडची लागण
पर्यटकांची संख्या आणि घाटातील वाहनांच्या संख्येचे प्रमाणात तसे वेळापत्रक तयार करणार आहे. या संदर्भात तातडीने त्याची अंमलबजावणी या शनिवारपासून करण्यात येणार आहे. त्यासाठी वन व्यवस्थापन समितीचे स्तरावर त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी संबंधितास आवश्यक ते आदेश आणि सुचना देखील केल्या आहेत, अशी माहिती भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी दिली.
उपाययोजना
- -सुरक्षारक्षकांना गणवेश, रेनकोट देणार
- -वाहनतळावर पांढरे पट्टे मारणे
- -वाहनतळाची दुरवस्था दूर करणार
- -वन आणि वाहतूक व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
- -प्रवासी वाहनांबाबत पोलिस, परिवहन विभागाची मदत घेणार
- -धोकादायक, भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई होणार
4 Comments