इस्रायलचा UN च्या शांतता सैनिक चौक्यांवर हल्ले, ६०० भारतीय जवानांचे जीव धोक्यात

बनॉनमधील युनायटेड नेशन्स इंटरिम फोर्सचे (UNIFIL) नकौरा मुख्यालय आणि आसपासच्या स्थानांवर इस्रायली सैन्याने वारंवार हल्ला केल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) म्हटले आहे. यानंतर भारताने ६०० हून अधिक भारतीयांचा जीव धोक्यात असल्याचे म्हणत चिंता व्यक्त केली आहे.
ब्लू लाइनवर ६०० हून अधिक भारतीय सैनिक तैनात
दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायल-लेबनॉन सीमेवर १२० किमीच्या ब्लू लाइनवर ६०० हून अधिक भारतीय सैनिक तैनात आहेत. ते संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेचा भाग आहेत. दरम्यान इस्रायल सैन्याकडून सैन्याने वारंवार ‘या’ प्रदेशातील हिजबुल्लाच्या लक्ष्यांवर हल्ले केले जात आहे. त्यामुळे UN रक्षकांच्या सुरक्षेबाबत भारताने चिंता व्यक्त केली आहे
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी (दि.११) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “ब्लू लाईनवरील बिघडत चाललेल्या सुरक्षा परिस्थितीबद्दल आम्ही चिंतित आहोत. आम्ही परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहोत. संयुक्त राष्ट्राच्या परिसराच्या अभेद्यतेचा सर्वांनी आदर केला पाहिजे आणि त्यासाठी योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत. यूएन शांती सैनिकांची सुरक्षा आणि त्यांच्या आदेशाचे पावित्र्य सुनिश्चित केले पाहिजे असे देखील परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. लेबनॉनमधील युनायटेड नेशन्स इंटरिम फोर्स (UNIFIL) चे नकोरा मुख्यालय आणि जवळपासच्या स्थानांवर इस्रायली सैन्याने वारंवार हल्ला केल्याचे UN ने म्हटल्याच्या एक दिवसानंतर भारताकडून हे विधान आल्याचे देखील वृत्तात म्हटले आहे.
इस्रायलच्या हल्ल्यात २ शांतता सैनिक जखमी
“आज सकाळी, इस्रायल सैन्याने (IDF) मेरकावा टँकने नाकोरा येथील UNIFIL च्या मुख्यालयातील निरीक्षण टॉवरवर गोळीबार केल्याने दोन शांतता सैनिक जखमी झाले. ते थेट आदळले आणि खाली पडले,” असे संयुक्त राष्ट्राने (UN) निवेदनात म्हटले होते. सुदैवाने हे दोघेही गंभीर नाहीत, परंतु ते रुग्णालयातच आहेत,” असेही त्यात म्हटले होते.