महाराष्ट्रात किती मतदार आहेत? पुरुष, महिला, तरूण आणि प्रथम मतदारांची आकडेवारी पहा

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, राज्यातील सर्व २८८ जागांसाठी २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून विधानसभा निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होतील. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर रोजी जारी केली जाईल, तर नामांकनाची अंतिम तारीख २९ ऑक्टोबर आहे. ३० ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार असून ४ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
महाराष्ट्रातील मतदारांची संख्या –
महाराष्ट्रातील एकूण मतदारांची संख्या सुमारे ९.६३ कोटी असून त्यापैकी ४.९७ कोटी पुरुष मतदार आहेत. तर महिला मतदारांची संख्या ४.६६ कोटी आहे. तरुण मतदारांची संख्या १.८५ कोटी आहे. तर पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या 20.93 लाख आहे. महाराष्ट्रात एकूण ५२ हजार ७८९ ठिकाणी १ लाख १८६ मतदान केंद्रे असतील. त्यापैकी ४२ हजार ६०४ शहरी भागात तर ५७ हजार ५८२ ग्रामीण भागात आहेत. एका मतदान केंद्रावर सरासरी ९६० मतदार मतदान करतील.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे गणित –
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत, तर बहुमतासाठी १४५ जागा आवश्यक आहेत. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १५३ जागांवर निवडणूक लढवली होती. तेव्हा भाजपने अविभाजित शिवसेनेसाठी 124 जागा सोडल्या होत्या. तर एनडीएने इतर मित्र पक्षांसाठी १२ जागा सोडल्या होत्या. यापूर्वी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १२२ आणि २०१९ मध्ये १०५ जागा जिंकल्या होत्या.
लोकसभा निवडणुकीत युतीची कामगिरी काय होती?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीची कामगिरी चांगली नव्हती. ज्यामध्ये तिन्ही पक्षांनी मिळून लोकसभेच्या केवळ १७ जागा जिंकल्या. तर महाविकास आघाडीची कामगिरी अपेक्षेप्रमाणे चांगली राहिली होती. शिवसेना (UBT), NCP (SP) आणि काँग्रेस यांचा समावेश असलेल्या विरोधी महाविकास आघाडीने (MVA) चमकदार कामगिरी केली आणि ४८ पैकी ३० जागा जिंकल्या.