साठ टक्केच स्कूल व्हॅन चालकांकडे योग्यता प्रमाणपत्रच नाही

पुण्यात वानवडी परिसरात स्कूल व्हॅन चालकाने अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. शहराच्या अन्य भागातही अशा घटना समोर येत आहेत. यापार्श्वभमीवर सतर्कता बाळगली जात आहे. शहरात सहा हजार स्कूल व्हॅनची नोंदणी असताना त्यापैकी साठ टक्के स्कूल व्हॅन चालकांनी योग्यता प्रमाणपत्र घेतले नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे खरचं विद्यार्थी वाहतूक सुरक्षित होते का? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे आरटीओने आता या सर्व स्कूल व्हॅनची तपासणी सुरू केली आहे. त्याबरोबरच शाळांनी देखील स्कूल व्हॅन व बसची जबाबदारी घेणे गरजेचे आहे.
स्कूल व्हॅन मध्ये दिवसेंदिवस लहान मुलींवर अत्याचार वाढत आहेत. त्यामुळे आरटीओ प्रशासन आता अॅक्शन मोडवर आले आहे. सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी त्यांच्याकडे असलेल्या स्कूल व्हॅन, बसची माहिती आरटीओच्या वेबसाइटवर येत्या १५ दिवसांत भरावी, असे आदेश पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) केले आहेत. ज्या शाळा ही माहिती भरणार नाहीत त्यांना आता शिक्षण विभागाही नोटीस बजावणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
आरटीओने एक वेबसाइट तयार केली आहे. त्या वेबसाइटवर स्कूल व महाविद्यालयांनी त्यांच्याकडे असलेल्या सर्व स्कूल बस व व्हॅनची माहिती टाकणे बंधनकारक केले आहे. त्यामध्ये स्कूल व्हॅनचा नंबर, त्यामधून वाहतूक होत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, त्यावर अटेंडन्स आहे का अशी माहिती देणे गरजेचे आहे. ही माहिती येत्या पंधरा दिवसात टाका अशा सूचना आरटीओकडून शाळा व महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.