
स्वारगेटच्या घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणी वर आला.. तथापि निर्माण झालेली परिस्थिती , त्यावर उपाययोजना, घेण्याची खबरदारी या मुद्द्यांपेक्षा राजकीय रणकंदन जास्त माजले. त्यामुळे मूळ प्रश्न आणि त्यावरील उत्तर हे मागे पडले . राजकारण्यांचा धांगडधिंगा , सामाजिक संस्था _ व्यक्तींचा आरडाओरडा, त्यातील आंदोलन, मंत्री _ लोकप्रतिनिधी_ सरकार यांची बदनामी. या पलीकडे जाऊन या सगळ्या घटनेकडे बारकाईने पाहिले पाहिजे आणि विशेष म्हणजे त्याची दुसरी बाजू देखील पाहिली पाहिजे, जी आजपर्यंत कुणीही चर्चित देखील आणली नाही .
————————————————————————-
राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विद्येचे माहेरघर आणि सुसंस्कृत शहर अशी ओळख असलेल्या पुण्यातील गजबजलेल्या आणि सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या स्वारगेट बस स्थानकात एका सराईत गुन्हेगार असलेल्या नराधमाने बस स्थानकातच उभ्या राहिलेल्या शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. स्वारगेट सारख्या वर्दळीच्या बस स्थानकात घडलेल्या या घृणास्पद घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. पुण्यासारख्या देशाच्या सांस्कृतीक राजधानीत आणि विद्येच्या माहेरघरात एका तरुणीची अब्रू लुटली गेल्याने पुण्यासारख्या सुसंस्कृत शहराची मान शरमेने खाली झुकली आहे. एकेकाळी पुणे हे मुलींसाठी सर्वात सुरक्षित शहर समजले जात होते मात्र मागील काही वर्षापासून पुण्याची ही ओळख पुसली जात आहे.
दोन वर्षापूर्वी पहाटे कामावरून घरी परतणाऱ्या एका संगणक अभियंता तरुणीवर रिक्षा चालकाने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यातीलच वानवडी परिसरात घडली होती. त्याआधी मुंबईतील सावित्रीबाई फुले वसतिगृहातील विद्यार्थिनीचा विनयभंग करून सुरक्षा रक्षकाने तिची हत्या केली होती. पुण्यातच एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थिनीची हत्या झाली होती.
शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना शोभणीय नाहीत. पुरोगामी महाराष्ट्रालाशरमेने खाली मान घालायला लावणाऱ्या या घटना आहेत. महिलांकडे उपभोगी वस्तू म्हणून पाहण्याची पुरुषी मानसिकता वाढू लागली आहे हीच मानसिकता यामागे कारणीभूत आहे. आज राज्यातील कोणत्याच महिला सुरक्षित नाही मग ती तीन वर्षाची चिमुरडी असो की सत्तर वर्षाची आजी. शाळा, कॉलेज, कामाचे ठिकाण, सार्वजनिक वाहन, स्वतःचे घर इतकेच काय तर पोलीस स्टेशन देखील महिलांसाठी सुरक्षित नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.
मुख्य म्हणजे कोणत्याही स्थितीमध्ये शंका कवा भीती वाटत असल्यास त्वरित मदतीसाठी जोरात ओरडायची खबरदारी महिलांनी जरुर घ्यावी. एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत जायची वेळ आल्यास आणि त्याने चुकीचे वागणे सुरू केल्यास त्वरित विरोध करायला मुलींना शिकवायला हवे. ताज्या दुर्घटनेमध्ये मुलीने घाबरुन जात पुढचा प्रवास सुरू केला. मात्र अशा वेळी विश्वासातल्या मित्रांना कवा कुटुंबातील सदस्यांना संपूर्ण घटनाक्रम तात्काळ सांगायला हवा. यामुळे मदत लवकर मिळते, खेरीज आरोपीला पकडण्यासाठी तात्काळ उपायोजना करता येतात. तेव्हा एकटे न राहता सुरक्षिततेसाठी कोणाची तरी सोबत घेणे आणि परिचितांना कळवणे गरजेचे ठरते.
दुसरी बाजू
तथापि या प्रकरणाची दुसरी बाजू देखील असू शकते . दुसरी बाजू मांडणे खूपच धाडसाचे ठरेल . त्यामुळे कदाचित कुठल्याही माध्यमातून या बाजूवर चर्चा झाली नाही . किंबहुना ही बाजू तथाकथित समाजसेवक , आंदोलन किंवा एका मोठ्या प्रमाणात सरकारला आणि व्यवस्थेला धारेवर धरून पाहणाऱ्या , आरोपीच्या कठडीत उभ्या करणाऱ्या व्यापक लोकसमूहासाठी फारशी हिताची नसावी किंवा आपण तो जो स्त्री दाक्षिण्य याचा विचार मांडत असतो , त्याला ती अनुरूप नसावी . म्हणून यावर कोणी कधी चर्चा केली नाही. परंतु प्रत्येक नाण्याला तसेच दुसरी बाजू असते. तशी याही घटनेला दुसरी बाजू आहेच आणि त्यावर कोणीतरी कधीतरी व्यक्त झाले पाहिजे.
ही घटना घडल्यानंतर जेव्हा राज्य सरकारची प्रतिनिधी म्हणून गृहराज्य मंत्रांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा या त्यांनी या दुसऱ्या बाजूचे डोळे थोडेसे किलकिले करून उघडण्याचा प्रयत्न केला . परंतु तात्काळ त्यांच्यावर चहूबाजूने भडीमार करण्यात आला आणि त्यांना तोंड बंद करावे लागले. कदाचित या लेखानंतर तो भडिमार आमच्या माध्यम समूहावर देखील होईल. परंतु सत्य मांडणे हे कधी कधी त्या प्रसंगाची नाही तर काळाची गरज असते, या पत्रकारितेच्या मूल्याशी इमान राखून ही बाजू जनतेसमोर आणली पाहिजे.
स्वारगेटच्या त्या बस झालेला प्रकार पाहण्यासाठी जेव्हा पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले त्यावेळी सकाळी पाचच्या सुमारास संबंधित आरोपी दत्ता गाडे शांतपणे उतरून निघून गेला. त्यानंतर 15 मिनिटानंतर संबंधित स्त्री देखील उतरून त्याच पद्धतीने निघून गेली, हे सर्वांनी पाहिले. त्या ठिकाणी त्या स्त्रीने घटना घडल्याच वेळी किंवा तो प्रकार घडते वेळी आरडाओरडा का केला नाही ? ही साधी सरळ शंका प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली असेल. परंतु स्त्रीवर अत्याचार करणारा पुरुष म्हणजे तोच आरोपी, तोच दंडास पात्र . त्याला मारा , खोडा , फासावर लटकवा अशी एक सार्वत्रिक भावना असते म्हणून या गोष्टीकडे कोणी फारसे कुणी पाहिले नाही . सगळे दत्ता गादे या आरोपीच्या माग लागण्याच्या पाठीमागे गुंतले.
पण त्या महिलेने आरडाओरडा का केला नाही ? या साध्या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नाही. महिला सुरक्षेसाठी सरकारने, पोलीस प्रशासन तसेच अन्य प्रशासनाच्या मदतीने इमर्जन्सी ॲप पासून ते संकटग्रस्त महिलांनी मिस कॉल देण्यापर्यंतच्या अनेक सोयी सविधा उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा वापर करण्यासाठी जागरूकता करण्यात आली आहे. त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च सरकारने आणि प्रशासनाने केला आहे. यातील एकाही टूल्सचा, सुविधेचा वापर त्या महिलेने का केला नाही ?
घटना घडल्यानंतर चार तासानंतर तिने एका मित्राच्या मदतीने पोलिसांना ही माहिती दिली. मग या चार तासांमध्ये असा काय विचार विनिमय, विचारमंथन झाले की यामुळे तिने तात्काळ निर्णय घेतला नाही. अशा प्रकारची तक्रार देण्यासाठी साधारणतः तिचे पती किंवा आई-वडील किंवा जवळच्या नातेवाईक याने पुढाकार घेतला पाहिजे. हे कुठलेही नातेवाईक चर्चेत, दृष्टीपथात नसताना तिचा कोणी एक मित्र ह्या गुन्हा दाखल करण्यासाठी पुढाकार घेतो. याचे काय कारण असावे ?
संबंधित महिला इतके रात्री तेथे का गेली? कोणत्या प्रवासाला निघाली होती, तिची गाडी कधी आली, पुणे शहरांमध्येच राहणाऱ्या या महिलेला स्वारगेट वरून अन्य सोयीच्या वेळांमध्ये त्या गावाला निघणाऱ्या गाड्या नव्हत्या का ? तिला पहाटेचीच वेळ का निवडावीशी वाटली ? हे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.
आरोपींनी दिलेल्या प्राथमिक माहितीतून तर या महिलेचे आणि त्या आरोपीचे पहिल्यापासून ची ओळख आहे असे समजते. मग ठराविक गावाला जाणारी गाडी कुठे उभी राहते ? ही विचारणा महिलेने केली _ ती दाखवण्यासाठी आरोपी गेला आणि गाडीत आत गेल्यानंतर त्याने अत्याचार केला . या घटनेला नेमका कशाचा आधार आहे ? आता आरोपीच्या मते तर हा बलात्कार नाहीच तर हे संमतीने घडलेला प्रकार आहे आणि पैशाच्या देवाणघेवाणीवरून हे झाले आहे. तिने आधी 7, 000 मागितले मग वीस हजारापर्यंत गेली…. हे सगळ्याची शहानिशा काहीच होणार नाही का ? मग गेल्या तीन दिवसापासून गळा काढणारे स्त्री संस्कृती रक्षक यावर काय उत्तर देतील ?
बर ! जरी आपण आरोपीचे म्हणणे नाकारले , त्यांची अगदी पहिल्यांदाच त्याच पहाटे स्वारगेटवर भेट झाली असे गृहीत धरले तरी ती गाडी इतका कोपऱ्यामध्ये बंद अवस्थेमध्ये पडली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ होती. गंदगी होती. अस्वच्छता होती. साधारण रोजच्या चलनात असणारी गाडी आणि बंद पडलेली गाडी हा फरक सहज लक्षात येतो. अशावेळी त्या महिलेने संबंधित आरोपीवर विश्वास ठेवला आणि त्या गाडीमध्ये ती चढून आत देखील गेली. हे तिने का केले असावे ? तिला जरा सुद्धा याबाबत शंका आली नाही का ? ….. पुन्हा त्यांच्यामध्ये मतभेद झाले म्हणून मित्राच्या मदतीने ते प्रकरण गुन्हा नोंदणी पर्यंत गेले ? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. संबंधित आरोपी दत्ता गाडे यांनी केलेले कृत्य हे निश्चितच नालायकपणाची कृती आहे, त्याचे कुणीही समर्थन करणार नाही . परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये ही वेळ येईपर्यंत महिलेच्याही काही चुका आहेत का ? हे देखील तपासले पाहिजे .
anirudhabadave@gmail.com