‘गदर 2’वरून मोठा गोंधळ; चित्रपटगृहाबाहेर करण्यात आला बॉम्बस्फोट
पटणा | Gadar 2 – सध्या सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर 2’ (Gadar 2) हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून मोठी कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच आता ‘गदर 2’वरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
‘गदर 2’ च्या तिकिटांना सध्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पटणामध्येही या चित्रपटाच्या तिकिटावरून मोठा गोंधळ उडाला. हा गोंधळ एवढा वाढला की संशयितांनी चित्रपटगृहाबाहेर बॉम्बस्फोट केला. संशयितांनी चित्रपटगृहाबाहेर कमी तीव्रतेचे बॉम्ब फेकले, त्यापैकी एका बॉम्बचा स्फोट झाला. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. तसंच या हल्ल्यानंतर पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे, याबाबतचं वृत्त बॉलीवूड हंगामानं दिलं आहे.
या बॉम्बस्फोटाबाबत चित्रपटगृहाचे मालक सुमन सिन्हा यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, ‘गदर 2’ची तिकिटे संशयितांना ब्लॅकमध्ये विकायची होती. पण त्यांचं कर्मचाऱ्यांनी ऐकलं नाही त्यामुळे त्यांनी बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न केला. संशयितांना आम्ही चित्रपटाच्या तिकिटांचा काळाबाजार करू द्यावा अशी त्यांची इच्छा होती, पण आम्ही त्यास नकार दिला.