धक्कादायक! पुण्यात पतीनं केली पत्नीची निर्घृण हत्या, अवघ्या दीड वर्षातच मोडला सुखी संसार

पुणे | Pune Crime News – सध्याच्या काळात चारित्र्याच्या संंशयावरून अनेकांचा सुखी संसार मोडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीची किंवा पत्नीनं पतीची हत्या केल्याचे अनेक धक्कादायक प्रकार घडताना दिसतात. तर आताही पुणे (Pune) शहरात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. येरवडा परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष भोसले असं हत्या केलेल्या आरोपी पतीचं नाव आहे. तर रूपाली भोसले हे मृत पत्नीचं नाव आहे. आशिष आणि रूपाली यांच्या लग्नाला दीड वर्ष झालं होतं. त्यांना एक सात महिन्यांची मुलगी देखील आहे. आशिष हा हॉटेलमध्ये साफ सफाईचे काम करत होता. तर रूपाली ही धुणी-भांडींचं काम करत होती.
आशिष रूपालीवर नेहमी अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत होता. त्यामुळे त्या दोघांमध्ये सारखं भांडण देखील होत होतं. तर शनिवारी रात्री आशिष आणि रूपालीचं जोरदार भांडण झालं. यावेळी त्यानं रूपालीला शिवीगाळ करत तिच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर धारदार चाकून वार करून तिला जखमी केले. त्यानंतर तिला रूग्णालयात नेण्यात आलं पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान, पोलिसांनी आरोपी आशिष भोसलेवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.