पुणेसिटी अपडेट्स

येरवड्यातील पाम उद्यान समस्यांच्या विळख्यात

येरवडा ः येरवडा-पालिका उद्यान विभागाच्या वतीने येरवडा भागातील भारतनगर परिसरात कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले पाम उद्यान हे विविध समस्यांच्या विळख्यात अडकल्यामुळे पालिका उद्यान विभाग अधिकार्‍यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून या उद्यानाला वाली कोण? असा प्रश्न येथे येणार्‍या नागरिकांना पडला आहे. पालिका उद्यान विभागामार्फत वडगाव शेरी मतदारसंघात विविध उपनगर भागात कोट्यवधी खर्च करून उद्याने उभारण्यात आली असली तरी येरवडा परिसरातील इंदिरानगर, फुलेनगर, भारतनगर, शांतिनगर व विश्रांतवाडी परिसरातील नागरिकांसह बालचमूसह उद्यानच नाहीत. नागरिकांमध्ये उद्यान नसल्यामुळे नाराजी पसरली होती.

याबाबत विविध पक्षांतील राजकीय पुढार्‍यांनी पाठपुरावा केल्यानंतर अखेर यश आले. भारतनगर परिसरात जवळपास आठ एकरांमध्ये हे उद्यान उभारून त्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. पण उद्यानात आल्यावर वाहनतळाची व्यवस्था जरी करण्यात आली असली तरी पालिका पथविभागाच्या वतीने बसविण्यात आलेले पथदिवेच बंद अवस्थेत आहेत. यामुळे वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करण्याची वेळ येतेे. त्यातच लाखो रुपये खर्च करून उद्यानात उभारण्यात आलेल्या पामच्या झाडांना पाणी घालण्यासाठी माळीच ठेवण्यात न आल्याने ती सुकलेल्या अवस्थेत दिसून येतात. याबरोबरच परिसरात अनेक वेळा नागरिकांना सरपटणा प्राणी दिसतात. हिरवळ ही मोठ्या प्रमाणात वाढल्याने एखाद्या दिवशी काही दुर्घटना घडली तर यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे. कारण येथे नागरिकांसह बालचमूदेखील उद्यानात खेळण्याचा आनंद लुटण्यासाठी येत असतात.

उद्यानात प्रवेश केल्यावर नागरिकांच्या उत्साहासाठी कारंजेदेखील बसविण्यात आले आहेत. पण त्याचेदेखील काम अर्धवट अवस्थेत असून त्यामध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे डासांचे प्रमाण परिसरात वाढल्याचे दिसून येत आहे. यामुळे उद्यानात येणार्‍या नागरिकांना आरोग्याचा मुख्य प्रश्न सतावत आहे. बसविण्यात आलेले कारंजे फक्त शो दाखविण्यासाठी बसविण्यात आले की काय?अशी शंका नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे, तर पाण्याचा तलाव जरी उद्यानात बांधण्यात आला असला तरी त्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे शेवाळ मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे, तर त्यालगत सरंक्षणासाठी बसविण्यात आलेले लोखंडी गज कमी उंचीचे असल्याने येथे दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. तलावासमोरच राज्यासह परराज्यातून किमतीचे दगड आणून त्या ठिकाणी झरा बनविण्यात आला आहे.

पण तोदेखील आजपर्यंत सुरू नसल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्यानाला कोट्यवधी खर्च करून उपयोग काय? बाहेरून येणार्‍या नागरिकांसाठी स्वच्छतागृह जरी बांधण्यात आले असले तरी पण त्याचीदेखील दुरवस्था होऊन या ठिकाणी अनेक जण गुटखा थुंकण्यासाठी या स्वच्छतागृहांचा वापर करीत आहेत. टेबल टेनिसचे मैदान बनविण्यात आले आहे. मात्र सरावाच्या जाळी व तेथील लोखंडी गजच गायब असल्याने क्रीडाप्रेमींना अडचणींना सामो जाण्याची वेळ येत आहे. ज्यावेळेस संबंधित उद्यानाचे काम सुरू होते. तेव्हा उद्यानातील विद्युत मोटारी चोरीला गेल्याच्या घटनादेखील परिसरात घडल्या आहेत. कामे अर्धवट राहिल्याने नागरिकांमध्ये याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सर्वसामान्य जनतेच्या करातूनच बनविण्यात आलेल्या उद्यानात विविध सुविधांचा अभाव दिसून येत असेल तर पालिका उद्यान विभागाचे अधिकारी हे सर्वसामान्य जनतेच्या पैशाची लूट करून जनतेच्या जिवाशी खेळतच आहेत, हे मात्र निश्चित. यासंदर्भात पालिका उद्यान विभागाचे अधिकारी तुमाले यांच्याशी संपर्क साधला असता मध्यंतरीच्या काळात कामाचे टेंडर बंद होते. पण आता ते चालू झाल्यामुळे काही दिवसांतच बंद असलेले काम सुरू होण्याचा दावा केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये