ताज्या बातम्यापुणे

रस्ते महामंडळाची जागा कवडीमोल दराने बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव

ससून रुग्णालयासमोरील मोक्याची प्रशस्त सव्वादोन एकरची जागा रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) निधी उभारणीच्या नावाखाली कवडीमोल दराने खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे. केवळ ६० कोटी रुपयांच्या बदल्यात तब्बल ९९ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर ही जागा देण्यात येत आहे. याचा निषेध म्हणून आज पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन इतर कंत्राटदार सभासदांच्या वतीने आज निदर्शने करण्यात आली. याठिकाणी अभियंत्यांचे आराध्य दैवत भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या स्मारक व बांधकाम भवन निर्माण करण्यात यावे अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

संघटनेचे अध्यक्ष रवींद्र भोसले म्हणाले की, मंगळवार पेठ येथील सुमारे सव्वादोन एकर जागा बांधकाम विभागाची आहे. विश्वेश्वरैय्या यांनी या ठिकाणी काम केले आहे. १५ सप्टेंबरला त्यांची जयंती साजरी केली जाते. याच दिवशी अभियंता दिन साजरा केला जातो. यामुळे या ठिकाणी सर विश्वेश्वरैय्या यांचे छोटेखानी स्मारक उभारण्याची व बांधकाम भवन निर्माण करण्यात यावे हि मागणी इंजिनिअर्स कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने केली.

या वेळी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र भोसले, उदय साळवे, अनिल परदेशी, संजय पाटील, तुषार पुस्तके, अमोल राजगुरू, सचिन डावरे, भालचंद्र हुलसुरे, रवींद्र लोखंडे व संघटनेचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

भोसले म्हणाले की, रस्ते विकास महामंडळाच्या मालकीची मंगळवार पेठेतील ही अंदाजे सव्वादोन एकर जागा ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर देण्यासाठी शासनाने कमिटी नेमून काही महिन्यांपूर्वी थेट अध्यादेश काढून एका खासगी बिल्डरला ही जागा देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. जागेचा बाजारभाव आणि भविष्यातील आजूबाजूला होणारा विकास पाहता, ही जागा अत्यंत कवडीमोल दराने दिली जात आहे.

रस्त्यांचा विकास व बांधकाम देखभालीसाठी राज्य सरकारने सन १९९६ मध्ये राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना केली. त्या वेळी महामंडळाकडे मालमत्ता असावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांची मालकीच्या काही जागा रस्ते महामंडळाला भाडेतत्त्वावर दिल्या होत्या. या जागांच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधी उभारण्यास मान्यता दिली. त्यासाठी खासगी संस्थांना भाडेतत्वावर जागा देण्यास सरकारने २०१६ ला रस्ते विकास महामंडळाला परवानगी दिली. त्यानुसार, मंगळवार पेठेतील सव्वादोन एकर जागा कवडीमोल दराने बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट महामंडळाने घातला आहे.

कर्करोग रुग्णालयचा प्रस्ताव बारगळला?

ससून रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव आधुनिकीकरणासाठी रुग्णालयाच्या मंगळवार पेठेतील रस्ते विकास महामंडळाच्या जागेत कर्करोग रुग्णालय उभारण्याचे काही वर्षांपूर्वी विद्यमान पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश दिले होते. त्या संदर्भात ससून रुग्णालय प्रशासनाने आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू केली. महामंडळांचा होणारा तोटा राज्य सरकार भरून काढेल, असेही ठरले होते. त्यानुसार सन २०१३ मध्ये महामंडळाने वैद्यकीय शिक्षण खात्याला ही जागा देण्यास हरकत नसल्याचे कळविले होते. त्यापुढे कोणतीही कार्यवाही न झाल्याने कर्करोग रुग्णालयाचा प्रस्ताव बारगळला. मात्र, नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात ससून रुग्णालयासंदर्भात विविध प्रश्नांवर उत्तरे देताना रस्ते महामंडळाच्या मंगळवार पेठेतील जागेवर कर्करुग्णालय उभारण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती. त्यामुळे रुग्णालय उभारण्याच्या हालचालींना वेग येऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली.

सर विश्वेश्वरैय्या यांचे स्मारक उभारण्याची मागणी

पुणे शहरातील मंगळवार पेठ येथे असलेल्या बांधकाम विभागाच्या जागेत भारतरत्न सर विश्वेश्वरैय्या यांचे स्मारक उभारण्याची मागणी पुणे जिल्हा इंजिनिअर्स व कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने नुकतीच सार्वजनिक बांधकाममंत्र्यांकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये