निरंजन सेवाभावी संस्थेचा पुढाकार
पुणे : शालेय विद्यार्थ्यांची तृष्णा भागविण्यासाठी कर्वेनगरमध्ये पुणे मनपा शाळेत निरंजन सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने ‘जलकुंभ आरओ फिल्टर प्रकल्प’ उभारण्यात आला आहे. कै. शिवनारायणजी मदनलालजी भुतडा व कै. रामेश्वरीजी शिवनारायणजी भुतडा यांच्या स्मरणार्थ सम्राट अशोक विद्यामंदिर, पुणे मनपा शाळेत साकारण्यात आलेल्या प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच झाले.
कार्यक्रमाला नगरसेवक राजाभाऊ बराटे, सुनील भुतडा, सीमा बंग, लता भुतडा, शैला चांडक, गोविंद मुंदडा, शेखर सारडा, रमणलाल करवा, निरंजन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ.नवनीत मानधनी यांसह कर्वेनगर माहेश्वरी समाजाचे सर्व सदस्य व महिलावर्ग उपस्थित होता. सुंदराबाई मदनलाल भुतडा आणि राधा सुनील भुतडा व परिवाराने या प्रकल्पाकरिता मोठे सहकार्य केले आहे.
सुनील भुतडा म्हणाले, शालेय इमारत असूनही शाळेतील मुलांची फक्त पिण्यासाठी शुद्ध पाणी नसल्याने हेळसांड होत असल्याने आम्ही हा प्रकल्प येथे उभारण्यास सहकार्य केले. सुमारे तीन लाख रुपये खर्च या प्रकल्पास आला आहे. शाळेतील आर्थिकदृष्टया गरीब मुलांचे पिण्याच्या पाण्याचे दातृत्व आम्ही स्वीकारले असून, कोविड संकटानंतर पुन्हा एकदा शाळा सुरू झाली आहे. त्यामुळे यापुढेही विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची मदत लागली, तरीदेखील आम्ही ती देऊ, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
डॉ. नवनीत मानधनी म्हणाले, आपल्याजवळील दानशूर व्यक्तींना समाजातील आर्थिक दुर्बल घटकांच्या अडचणी दाखविण्यासोबतच त्यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न आम्ही संस्थेच्या माध्यमातून करीत आहोत. यावर्षी बीड, शिरूर, नांदगाव, रायगड, राजगड, तोरणा, शिवनेरीसह विविध जिल्ह्यांतील गरजू १५०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व संस्था स्वीकारत आहे. त्यासोबतच आता विविध शाळांमध्ये ज्या अत्यावश्यक सुविधा नाहीत, त्यादेखील पुरविण्याकडे संस्था पुढाकार घेत आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रमोद जाजू यांनी सूत्रसंचालन केले. विष्णू काळ्या यांनी आभार मानले.