शाळा म्हटलं की, मौजमज्जा असते असं नाही तर वेगवेगळ्या कलागुणांना वावदेखील तेथे मिळत असतो. उत्तम शिक्षक अनेक विद्यार्थी घडवत असतात. वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मुलांच्या मनात आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची वृत्ती निर्माण करतात.
अशीच एक पुण्यातील विठ्ठलवाडी भागातील तु. गो. गोसावी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे. या शाळेची स्थापना वर्ष 1994 ला झाली असून, शालेय पातळीवर विविध उपक्रम शाळेतील शिक्षक राबवत असतात. त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती, स्वातंत्र्यदिन, शिक्षकदिन, श्री गणेश प्रतिष्ठापना, नवरात्रोत्सवात भोंडला, दिवाळी दीपोत्सव, कै. मामासाहेब मोहोळ स्मृतिदिन, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले जयंती, स्वामी विवेकांनद जयंती, प्रजासत्ताक दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वर्षिक स्नेहसंमेलन, राष्ट्रीय विज्ञान दिन, संविधान दिन, वाचन प्रेरणा दिन आणि विशेष म्हणजे गरजू, अनाथ ,गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.
मुलांना भारतीय संस्कृती, सण याबद्दल माहिती व्हावी यासाठी सरस्वती पूजन व मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटपदेखील केले जाते. आपण आपला देश, परिसर, शाळा स्वच्छ ठेवली पाहिजे यासाठी स्वच्छता अभियान हा उपक्रम राबवून मुलांना स्वच्छतेचे धडे दिले जातात. प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी श्री विठ्ठल रखुमाई मंदिर व परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक माहिती दिली जाते. त्यावेळी विद्यार्थ्यांकडून मंदिर व परिसराची स्वच्छता केली जाते. तसेच मुलांकडून अथर्वशीर्ष पठण करून घेणे हादेखील उपक्रम राबिवला जातो. अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना घडवण्याचं काम या ज्ञानमंदिरात केले जाते.