प्रेरणा संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त विशेष गायन-वादन मैफल

पुणे : गेली १९ वर्षे शिक्षण, सांगीतिक कार्यक्रम आणि कार्यशाळा यांच्या माध्यमातून संगीताचा प्रसार करणार्या प्रेरणा संगीत संस्थेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवार, दिनांक ३० जुलै रोजी गायन- वादनाच्या विशेष मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सायंकाळी ५:३० वाजता होणार आहे.
हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे. कार्यक्रमात जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका विदुषी सानिया पाटणकर यांचे गायन आणि ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य अमर ओक यांच्या बासरीवादनाची जुगलबंदी आणि ज्येष्ठ संतूरवादक पद्मश्री सी. आर. व्यास यांचे पुत्र आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संतूरवादक पद्मश्री पं. सतीश व्यास यांचे संतूरवादन रसिकांना अनुभवयाला मिळणार आहे. प्रमुख कलाकारांना पं. रामदास पळसुले (तबला), रोहित मुजुमदार (तबला) आणि निरंजन लेले (हार्मोनियम ) हे कलाकार साथसंगत करणार आहेत.