सोलापूर हादरलं! पत्नी अन् मुलाची हत्या करत शिक्षकानं स्वत: केली आत्महत्या
सोलापूर | Solapur Crime : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी (Barshi) शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. बार्शीत राहणाऱ्या एका शिक्षकानं आपल्या पत्नीची आणि मुलाची हत्या करत त्यानं स्वत: आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना बार्शीतील नाईकवाडी प्लॉटमध्ये घडली आहे. तर अतुल मुंडे हे पत्नी, मुलाची हत्या करत आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे. अतुल मुंडे आणि त्यांची पत्नी दोघंही शिक्षक म्हणून काम करत होते. मुंडे हे करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. तर त्यांची पत्नी बार्शीतील अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. मात्र, मुंडेंनी एवढं टोकाचं पाऊल का उचलंल याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अतुल मुंडेंनी त्यांची पत्नी तृप्ती मुंडेंची गळा कापून हत्या केली. तर मुलगा सुमंत मुंडे याच्या तोंडावर उशी ठेवून त्याची हत्या केली. त्यानंतर अतुल मुंडेंनी स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर अतुल मुंडेंनी एवढं टोकाचं पाऊल का उचलंल याचा तपास पोलीस करत आहेत.