राष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम

‘समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा’ पंढरपूर

प्रा. डॉ. एस. एन. पठाण, माजी कुलगुरू

कुस्ती हा शब्द ‘कुश्ती’ या फार्सी भाषेवरून तयार झाला आहे. कुस्ती म्हणजे मल्लयुद्ध, अंगयुद्ध किंवा बाहुयुद्ध होय. महाभारतातील वर्णनानुसार श्रीकृष्ण, बलराम, भीम हे मल्लविद्येत पारंगत होते. भारतीय कुस्ती तांबडी मातीवर खेळली जाते, त्या मैदानास ‘आखाडा’ असे म्हणतात.

पंढरपूर वाखरीतळावर प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी “विश्वशांती गुरुकुल इंग्रजी माध्यमाची शाळा स्थापन केली व संस्थेच्या याच परिसरात डॉ. विश्वनाथ कराड यांनी श्री विठ्ठल मंदिराची उभारणी करून या संस्थेला आध्यात्मिक बैठक दिली आहे. भू-वैकुंठी पंढरपुरी आषाढी एकादशीला लाखो वैष्णव (वारकरी) पंढरपूरला एकत्र येतात व त्यांच्या निस्सीम भक्तीचे दर्शन घडते. याच वारकर्‍यांमध्ये उत्तम आरोग्याचा संदेश देण्यासाठी डॉ. कराड सरांनी ‘समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती स्पर्धा’ एकादशीच्या पूर्वसंध्येला सुरू करून एका अभिनव कल्पनेने भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम घडवून आणला आहे.

भक्ती आणि शक्तीचा हा अनोखा संगम म्हणजे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपचे एक वेगळेच दर्शन म्हणावे लागेल. आदिमानवापासून आत्मसंरक्षणासाठी मानव चढाया-लढाया करीत असे व त्यातूनच कुस्तीच्या द्वंद्वयुद्धाचा उगम झाला. कुस्ती हा शब्द ‘कुश्ती’ या फार्सी भाषेवरून तयार झाला आहे. कुस्ती म्हणजे मल्लयुद्ध, अंगयुद्ध किंवा बाहुयुद्ध होय. महाभारतातील वर्णनानुसार श्रीकृष्ण, बलराम, भीम हे मल्लविद्येत पारंगत होते. भारतीय कुस्ती तांबडी मातीवर खेळली जाते, त्या मैदानास ‘आखाडा’ असे म्हणतात. समर्थ विष्णुदास वारकरी स्पर्धेसाठी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी वाखरीतळावरील त्यांच्या शैक्षणिक संस्थेत स्वतंत्र ‘आखाडा’ बांधून घेतला आहे.

प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी या ‘भक्ती आणि शक्ती’च्या अनोख्या संगमासाठी ही सोईस्कर जागा वारकर्‍यांसाठी निवडली आहे. महाराष्ट्रातील बहुतेक पालख्या आषाढ शुक्ल नवमीला वाखरी या गावी म्हणजे पंढरपूरच्या सीमावर्ती भागात मुक्कामाला पोहोचतात. यावर्षी ८ जुलै रोजी हा आखाडा आयोजिण्यात आला होता. विश्वशांती गुरुकुलचा हा एकूण २० एकरांचा शैक्षणिक परिसर पुणे-पंढरपूर रोडवर वाखरी या पंढरपूरच्या सीमावर्ती भागावर आहे. परिसराच्या बाहेर उभारलेली भव्य कमान व स्वतंत्ररीत्या तयार करण्यात आलेले भव्य व्यासपीठ केवळ वारकर्‍यांच्या स्वागतासाठीच बांधण्यात आलेले असते.

नवमीला सकाळपासूनच पालख्यांचा ओघ वाखरीकडे यायला सुरू होतो, जणू तो वारकर्‍यांचा महापूरच असतो. वीणाधारक व तुळशीवृंदावन डोक्यावर घेऊन वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकरी बंधू-भगिनींना भव्य व्यासपीठावर वस्त्र (शाल) व माऊलींची प्रतिमा देऊन त्यांचा डॉ. विश्वनाथ कराड सत्कार करतात. विठ्ठलाच्या भेटीसाठीची वारी पूर्ण होण्यापूर्वीच मिळालेली शाल व माऊलींची प्रतिमा यामुळे वारकर्‍यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वाहत असतो. विविध मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार व्यासपीठावर वारकर्‍यांना देताना मान्यवरदेखील आनंदाच्या डोहामध्ये बुडून गेलेले असतात. मीसुद्धा या कार्यक्रमात सहभागी होतो व आनंदाचे डोही आनंद तरंगत असतो.

“समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा’’ ही वारकर्‍यांसाठीची स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे. अर्थात, त्यासाठी विश्वशांती केंद्राच्या माध्यमातून याची माहिती महाराष्ट्रात प्रत्येक तालमीवर व गावोगावी पोहोचवली जाते आणि म्हणूनच या स्पर्धेसाठी अनेक हिंदकेसरी, महाराष्ट्रकेसरी, शिवछत्रपती पुरस्कारविजेते व अनेक कुस्ती प्रशिक्षक या स्पर्धेला हजेरी लावत असतात. कुस्त्यांच्या संयोजनाची जबाबदारी विलास कथु व डॉ. पी. जी. धनवे यांच्यावर असते. यावेळी हिंदकेसरी पै. दीनानाथ सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

समितीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड अध्यक्ष्यस्थानी होते. हिंदकेसरी पै. जगदीश कालीरमण, महाराष्ट्रकेसरी पै. आप्पासाहेब कदम याशिवाय काशीराम दा. कराड, एमआयटी व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष डॉ. मंगेश कराड, माईर्स एमआयटी, पुणेचे कार्यकारी अध्यक्ष राहुल वि. कराड, प्रस्तुत लेखक स्वतः डॉ. एस. एन. पठाण आदी मान्यवर व कुस्तीतज्ज्ञ व कुस्तीशौकिन उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये