‘इंडिया’वरून घमासान
मोदी सरकार विरोधात अविश्वास ठरावाची तयारी
पुणे | भाजपविरोधी आघाडीने आपल्या आघाडीसाठी ‘इंडिया’ (India) हे नाव धारण केले आहे. ‘इंडिया’ नावावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधकांमध्ये घमासान शाब्दिक युद्ध मंगळवारी झाले. दरम्यान, मोदी सरकार विरोधात लोकसभेत अविश्वास ठराव आणण्याची तयारी ‘इंडिया’च्या घटक पक्षांनी चालू केल्याचे सूत्रांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक मंगळवारी सकाळी झाली. विरोधी पक्षांच्या आघाडीच्या ‘इंडिया’ नावावर मोदी यांनी प्रथमच भाष्य केले. विरोधकांवर कडाडून टीका करताना मोदी म्हणाले, यांना फक्त सत्ता हवी आहे आणि त्याकरिता देश तोडायलाही निघालेल्यांनी ‘इंडिया’ नावाचा उल्लेख असलेली ईस्ट इंडिया कंपनी आणि इंडियन मुजाहिदीन यासारखी नावे धारण केली आहेत.
या नावांमध्ये इंडिया जसे येते, तसेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेनेही आपल्या नावात इंडिया शब्दाचा समावेश केला आहे. केवळ इंडिया नाव धारण केल्याने लोकांची दिशाभूल होईल, अशा समजुतीत राहू नये. भारतीय जनता सुज्ञ आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी भाषणात बोलताना सांगितले. आम्ही मणिपूरमधील संवेदनशील स्थितीबद्दल बोलत आहोत, मात्र पंतप्रधान मोदी ‘इंडिया’ची तुलना ईस्ट इंडिया कंपनीशी करण्यात दंग झाले आहेत.
मोदी यांनी ‘इंडिया’वर बोलण्यापेक्षा मणिपूरमधील स्थितीबद्दल देशवासीयांसमोर भाष्य करायला हवे, असे प्रत्युत्तर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत बोलताना दिले. आपल्याला जे बोलायचे आहे ते बोला. पण, मिस्टर मोदी, आम्हीच ‘इंडिया’ आहोत असे उत्तर काँग्रेस पक्षाचे नेते, माजी खासदार राहुल गांधी यांनी ट्वीटरद्वारे दिले आहे. मणिपूरच्या जखमांवर मलम लावण्यासाठी आम्ही मदत करत राहू. तेथील प्रत्येक महिला आणि मुलांच्या डोळ्यातील अश्रू पुसत राहू. त्यांच्या आयुष्यात प्रेम आणि शांती आणू, असे राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. आपण खरेच संवेदनशील असाल, तर संसदेतील कामकाज बंद न पाडता तेथे चर्चेला वाव द्याल, अशी टीका भाजपचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीवर केली आहे.
राजस्थान, छत्तीसगढ आणि पश्चिम बंगालमध्ये जे घडत आहे, त्याचीही चर्चा मणिपूरबरोबर व्हायला हवी. विरोधी पक्ष महिलांविषयी खरोखरच संवेदनशील असता, तर त्यांनी चर्चा घडवून आणली असती. चर्चेत अडथळे आणले नसते, असे सागून गोयल म्हणाले, देशाचे भवितव्य आपण बिघडवत आहात याचे दृश्य सारे देशवासीय पाहात आहेत. संसदेचे अधिवेशन ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. त्यात केंद्र सरकार नवीन २१ आणि मागील अधिवेशनात मांडलेली १० विधेयके पुन्हा मांडणार आहे. दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा त्यात समावेश आहे.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेनेही आपल्या नावात इंडिया शब्दाचा समावेश केला आहे. केवळ इंडिया नाव धारण केल्याने लोकांची दिशाभूल होईल, अशा समजुतीत राहू नये. भारतीय जनता सुज्ञ आहे. — नरेंद्र मोदी, पंतप्रधान
मणिपूरमधील संवेदनशील स्थितीबद्दल न बोलता मोदी ‘इंडिया’ची तुलना ईस्ट इंडिया कंपनीशी करण्यात दंग झालेत. इंडियावर बोलण्यापेक्षा मणिपूरवर देशवासीयांसमोर भाष्य करायला हवे. — मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष