नोकरी देण्याच्या बहाण्याने एका महिलेने मावळ तालुक्यातील कान्हे फाटा येथील एका महिलेला फोन केला. नोकरी देण्यापूर्वी वेगवेगळ्या कारणांसाठी महिलेकडून एक लाख २७ हजार रुपये घेत महिलेला नोकरी न देता तसेच पैसे परत न करता तिची फसवणूक केली. ही घटना १८ मार्च ते २१ मार्च या कालावधीत आंबेवाडी, कान्हे फाटा, मावळ येथे घडली.
याप्रकरणी २९ वर्षीय महिलेने वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला अज्ञात महिलेचा ९८७१९१६०५२ या क्रमांकावरून फोन आला. फोनवरील महिलेने तिचे नाव तानिया सांगत ती एच सी एल टेक्नॉलॉजीस कंपनीमधून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर ९६४३३८३४०६ या क्रमांकावरून बोलणाऱ्या व्यक्तीने तो एच सी एल टेक्नॉलॉजीस या कंपनीचा एचआर हेड असल्याचे भासवले.
आरोपींनी फिर्यादी महिलेला नोकरी देण्यापूर्वी कंपनीचे ओळखपत्र, ऑफर लेटर, गेट पास, लपटॉप, बँक खाते सुरु करणे या कारणांसाठी ऑनलाईन माध्यमातून एक लाख २७ हजार ३५० रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी महिलेला नोकरी न देता तसेच तिचे पैसे परत न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक कुमार कदम तपास करीत आहेत.