शौक बडी चीज है… पठ्ठ्यानं लांडग्यासारखं दिसण्यासाठी खर्च केले लाखो रूपये

मुंबई | Man Look Like Wolf – आजकालच्या लोकांचे छंद काही निराळेच असतात. तसंच काही लोकं आपले छंद पूर्ण करण्यासाठी काहीही करायला तयार असतात. असाच एक प्रकार जपानमधील (Japan) एका तरुणानं केला आहे. या तरूणानं आपला छंद पूर्ण करण्यासाठी लाखो रूपये खर्च केले आहेत. या पठ्ठ्यानं त्याचा आवडता प्राणी लांडग्यासारखं (Wolf) दिसण्यासाठी चक्क 18 लाख रूपये खर्च केले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, जपानमध्ये राहणाऱ्या एका तरुणानं लांडग्यासारखं दिसण्यासाठी तब्बल 18 लाख रुपये खर्च केले आहेत. या तरुणानं हुबेहुब लांडग्यासारखं दिसण्यासाठी महागडा सूट बनवून घेतला आहे. त्यानं झेपेट नावाच्या कंपनीकडून 3,000,000 येन म्हणजे 18.5 लाख रुपये खर्च करून महागडा सूट तयार करुन घेतला आहे.
या तरुणानं याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “लहानपणापासून मला प्राण्यांची खूप आवड आहे. मी लहानपणी प्राण्यांसारखे दिसण्याचा प्रयत्न करायचो. खूप पूर्वी मी विचार केला की मला एखाद्या प्राण्यासारखं दिसलं पाहिजे. मला लहानपणापासूनच लांडग्यासारखं दिसण्याची इच्छा होती.”
दरम्यान, हा सूट बनवणाऱ्या झेपेट कंपनीनं सांगितलं की, “आम्ही ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन प्रत्येक लहान-लहान तपशील आणि माहिती घेऊन हुबेहुब लांडग्यासारखा दिसणार सूट तयार केला. आम्हाला हा सूट तयार करण्यासाठी सुमारे 50 दिवस लागले. तो तरूण हा लांडग्याचा सूट पाहून खूप खूश झाला. कंपनीच्या कामावर तो खूप प्रभावित झाला. त्यानं जसा विचार केला होता त्याहूनही अधिक चांगल्या प्रकारे हा सूट तयार करण्यात आला आहे.”