शेती गेली, पैसे गेले अन् न घेतलेले कर्ज आलं; ६० कोटींचे बनावट कर्ज, गावकऱ्यांना नोटिसा
छ. संभाजीनगर : बनावट कागदपत्रांआधारे आदर्श महिला नागरी सहकारी बँकेत संचालक आणि अधिकाऱ्यांनी परस्पर अनेक जणांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचललेचा प्रकार समोर आला आहे. शेंद्रा कमंगर गावातील ३२ जणांच्या नावे तब्बल ६० कोटी ४४ लाख ९९ हजार रुपये कर्ज काढण्यात आले. विशेष म्हणजे, बँकेकडून नोटीस आल्यानंतर आपल्या नावे कर्ज असल्याचे संबंधितांना माहिती पडले!
आदर्श घोटाळा प्रकरणी अटकेत असलेला शेंद्रा कमंगर येथील नामदेव दादाराव कचकुरे हा आदर्श बँकेत २३ वर्ष सहव्यवस्थापक होता. त्याने अधिक व्याजाच्या आमिषाने गावातील अनेकांना बँकेत ठेवी ठेवण्यास भाग पाडले. दरम्यान, गावातील ३२ जणांच्या नावे त्यांच्या परस्पर कर्ज उचलले. ही बाब आता उघड झाली. ऐन दिवाळीपूर्वी या सर्वांना बँकेकडून वसुलीची नोटीस आल्यानंतर त्यांना आपल्या नावे कर्ज असल्याचे माहिती पडले. त्यामुळे हे सर्वजण तणावाखाली आहेत.
शंकर नाईकवाडे यांनी एक एकर शेती विकली होती. त्यापैकी ५९ लाख रुपयांची ‘आदर्श’मध्ये एफडी केली. ही रक्कम मिळावी, यासाठी ते प्रयत्न करीत असतानाच त्यांच्या पत्नीच्या नावे १ कोटी ९४ लाख ३२ हजार ४०७ रुपयांचे कर्ज असल्याची नोटीस आली. हे कर्ज त्यांनी किंवा त्यांच्या पत्नीने घेतलेलेच नाही. ‘एफडी’वेळी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून कुणीतरी ते परस्पर उचलल्याचा दावा नाईकवाडे यांनी केला.
अनिल एकनाथ कचकुरे हे शेंद्रा फाट्यावर चहा विक्री करतात. त्यांचे आई-वडील, पत्नी या सगळ्यांच्या नावे परस्पर कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलले गेले. एवढे मोठे कर्ज घेतले तर चहा टपरीऐवजी फाइव्ह स्टार हॉटेल सुरू केले नसते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.