“मी देवेंद्र फडणवीसांच्या जागी असतो तर…,” आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य
मुंबई : (Aaditya Thackeray On Devendra Fadnavis) मी जर देवेंद्र फडणवीस यांच्या जागी उपमुख्यमंत्री पदी असतो तर, मी पदाचा राजीनामा दिला असता आणि नव्याने निवडणूक घेतली असती, असल्या असंवैधानिक सरकारमध्ये क्षणभरही राहिलो नसतो. मुळात फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन सरकार कसे स्थापन केले, हेच एक कोडे आहे. ते या सरकारमध्ये राहूच कसे शकतात, याचे मला आश्चर्य वाटतं असं ते म्हणाले आहेत.
या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांची ज्याप्रकारे बदनामी होत आहे, त्यांना ट्रोल केले जात आहे, ते पाहून मला खूपच वाईट वाटते. मला हे चित्र पाहवत नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक करत असताना, यावेळी त्यांनी शिंदे गटावर मात्र, सडकून टीका केली आहे. महाराष्ट्रात घडलं आहे तो प्रकार एका माणसाच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे झाला आहे. आम्हाला जे सोडून गेले ते त्यांच्या स्वार्थासाठी गेले. या कार्यक्रमात शिंदे गटाच्या आमदारांना पुन्हा एकदा गद्दार म्हणून हिणवले.
यावेळी ते म्हणाले, शिंदे गटाच्या आमदारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे. राज्यातील जनता ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाजूने आहे. गद्दारांनी जनादेशाचा अनादर केला. मी रोज किंवा जवळपास एक दिवसाआड हे आव्हान देत असतो. मात्र ते स्वीकारत नाहीत. मला पूर्ण राज्यात मध्यावधी निवडणूक व्हावी असे वाटत नाही. केवळ ४० जागांवर निवडणूक व्हावी, या मताचा मी असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.