मुख्यमंत्री शिंदे आदित्य ठाकरेंसोबत प्रकल्पावर चर्चा करतील का? १५ हजार लोकांच्या प्रतिक्रिया म्हणाले…
मुंबई : (Aaditya Thackeray On Eknath Shinde) महाराष्ट्रात येऊ घातलेले प्रकल्प गुजरात आणि इतर राज्यात जात असल्याने जनतेमध्ये संतापाची लाट आहे. दुसरीकडे राजकारणी मात्र आधीच्या सरकारचं अपयश की आताच्या सरकारचा निष्काळजीपणा? यावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडतायेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी तितकंच जोरदार प्रत्युत्तर दिलं.
आपल्यासोबत आणणेल्या काही कागदपत्रांचे गठ्ठेच त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींनी दाखवत फडणवीस खोटं बोलत असल्याचा आरोप केला. दरम्यान त्यांनी उद्योग क्षेत्राच्या स्पर्धेत महाराष्ट्र कमी पडतोय का? यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यासमोर एका मंचावर बसून समोरासमोर चर्चा करावी, असं चॅलेंज दिलं. याच आशयाचा पोल आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर घेतला. यावर जवळपास ७६ टक्के लोकांनी मुख्यमंत्री तुमच्यासमोर बसून चर्चा करणार नाहीत, असा कौल दिला.
वेदांता फॉक्सकॉनसह टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली. दोन्ही वेळी त्यांनी पत्रकार परिषदा घेऊन प्रकल्प राज्याबाहेर जाण्याला आताचं शिंदे सरकार कसं जबाबदार आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. फडणवीसांच्या पत्रकार परिषदेला त्यांनी अवघ्या काही तासांत काऊंटर करत त्यांचे एक एक दावे खोडून काढले.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच वक्तव्याचा पुरावा देऊन फडणवीसांना तोंडावर पाडले. जर आमच्याच काळात प्रकल्प राज्याबाहेर गेला तर मग मुख्यमंत्र्यांनी भर विधानसभेत तो वेदांतावाला आपल्याकडे येणार, ४ लाख कोटींची गुंतवणूक होणार…. असं सांगितलं, तर ते खोटं होतं का? असा जळजळीत सवाल विचारला. दोन दिवसांपूर्वीची आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद चांगलीच गाजली.