शिंदे गटाच्या ‘त्या’ दाव्यावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “अशा सडक्या विचारांचे लोक…”

मुंबई : (Aaditya Thackeray On Sanjay Shirsath) प्रियंका चतुर्वेदी या काँग्रेसच्या होत्या. पण, शिवसेनेत आल्यावर प्रियंका चतुर्वेदी यांची सुंदरता पाहून आदित्य ठाकरे यांनी त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.
दरम्यान, शिरसाट यांच्या वक्तव्यावर वरळीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीने आदित्य ठाकरे यांना विचारलं. यावर त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “गद्दार आमदारांची किंमत त्यांना कळली आहे. अशा सडक्या विचारांचे लोक राजकारणात टिकले कसे? हा प्रश्न पडतो.” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले, “त्यांच्या बोलण्याचं दु:ख देखील होतं. पण, जनता त्यांना जागा दाखवेल. ज्यांना जेवढी किंमत आहे, तेवढीच देऊया. जास्त बोलून त्यांना मोठं करणे योग्य नाही. त्यांच्या गटात त्यांना जिथे ठेवायचं आहे, तिथे ठेवलं आहे.”