ताज्या बातम्यादेश - विदेश

आम आदमी पार्टी काँग्रेसचा नवा मित्र

नव्या ‘इंडिया’त आम आदमी पार्टी पक्ष सहभागी झालेला आहे. २०१४ साली आम आदमी पार्टीने लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती. त्यानंतर पुण्यातून या पक्षाने विधानसभेची एक निवडणूक लढविली.

भाजप विरोधात लढण्यासाठी २६ पक्षांची इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स (इंडिया) नावाने आघाडी केली आहे. या आघाडीमुळे काँग्रेस पक्षाला आम आदमी पार्टी हा नवा मित्र मिळाला आहे. राजकीय पातळीवर पुण्यात ‘इंडिया’ची स्थिती विचारात घ्यावी लागेल. आगामी लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ भाजपशी टक्कर देणार आहे.

२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपने एकतर्फी निवडणुका जिंकून काँग्रेस पक्षाला गारद केले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ स्थापन झाल्यामुळे भाजप एकतर्फी निवडणूक जिंकू शकेल का, असा प्रश्न आहे. याबद्दल मतमतांतरेही आहेत. शहरातील राजकीय स्थितीचा विचार करता ‘इंडिया’त काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे दोन राजकीय पक्ष आहेत.

पुण्यात काँग्रेस पक्षाचे एक विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर (कसबा मतदारसंघ) असून, चंद्रकांत शिवरकर, मोहन जोशी, रमेश बागवे, अनंत गाडगीळ, दीप्ती चवधरी असे माजी आमदार आहेत. २०१७ साली महापालिकेच्या सभागृहात काँग्रेसचे फक्त ९ नगरसेवक होते. २०१४ साली माजी मंत्री विश्वजीत कदम आणि २०१९ साली मोहन जोशी यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. अगदी अलीकडे कसबा पोटनिवडणूक जिंकल्याने काँग्रेस पक्षात ‘जान’ आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. त्याआधी हा पक्ष काँग्रेस पक्षापेक्षा वरचढ होता आणि लोकसभेच्या उमेदवारीसाठी दावा करीत होता. उपमुख्यमंत्री अजित पवार सत्ताधारी महायुतीत सामील झाल्याने पक्षात मोठी फूट पडली. राज्यसभा सदस्य वंदना चव्हाण, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, माजी आमदार जयदेव गायकवाड आदी पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी निर्माण झालेली सहानुभूती आणि त्यांची लोकप्रियता हे ‘इंडिया’ चे बलस्थान आहे.

शिवसेना (उबाठा) गटात माजी आमदार शशिकांत सुतार, तसेच शिवसेनेचे जुने नगरसेवक, कार्यकर्ते हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साथ देत उभे आहेत. आता मात्र महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लढण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे. प्रस्थापित नेतृत्व न घेता कार्यकर्त्यांची नवी फळी उभी करून आम आदमी पार्टीने संघटना बांधली आहे. शिवसेना (उबाठा) बरोबर आघाडी करण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. ठाकरे आणि आंबेडकर एकत्र आल्यास ‘इंडिया’त आणखी एका पक्षाची भर पडेल. काँग्रेस आणि आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट, शिवसेना (उबाठा) असे चार पक्ष ‘इंडिया’त एकत्र असून,, वंचित बहुजन आघाडी हा त्यांचा संभाव्य मित्र आहे. अलीकडील राजकीय स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडलेली असल्याने ‘इंडिया’कडील मतांची आकडेवारी किती हे सांगणे तूर्त तरी अशक्य आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये