आबासाहेब गरवारे कॉलेज संघाला विजेतेपद

आंतरमहाविद्यालय पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धा
पुणे : पुणे शहर क्रीडा विभागांतर्गत आबासाहेब गरवारे महाविद्यालय आयोजित पुरुषांच्या आंतरमहाविद्यालय कबड्डी स्पर्धेत आबासाहेब गरवारे कॉलेज महाविद्यालय संघाने चुरशीच्या लढतीत संस्कार मंदिर महाविद्यालय संघाचा २७-२६ असा अवघ्या एका गुणाने पराभव करून विजेतेपद जिंकले. गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर संपलेल्या या स्पर्धेच्या अंतिम लढतीत गौरव नवले, तन्मय चव्हाण, ज्ञानेश्वर शितोळे, प्रथमेश बालवडकर यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर आबासाहेब गरवारे कॉलेज संघाने विजेतेपद जिंकले. पराभूत संस्कार मंदिर महाविद्यालय संघाकडून मयूर कदम, सौरभ पवार यांनी आपल्या संघाचा पराभव टाळण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. तृतीय क्रमांकाच्या लढतीत मामासाहेब मोहोळ महाविद्यालय संघाने नौरोसजी वाडिया संघाचा ३१-२१ गुणांनी पराभव केला.
तत्पूर्वी, पहिल्या उपान्त्य फेरीत आबासाहेब गरवारे महाविद्यालय संघाने मामासाहेब मोहळ महाविद्यालय संघाच्या २०-११ तर संस्कार मंदिर महाविद्यालय संघाने नौरसजी वाडिया संघाचा २७-२४ गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या स्पर्धेतून पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित आंतरविभागीय स्पर्धेसाठी पुणे शहर क्रीडा विभाग संघ निवडला जाणार आहे.
स्पर्धेचा पारितोषिकवितरण समारंभ गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. बी. बुचडे यांच्या हस्ते पार पडला या वेळी डॉ. सुदाम शेळके, डॉ. उमेश बिबवे, प्रा. अभिजीत परसे उपस्थित होते. सचिव डॉ. आशा बेंगळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.