“आज बाळासाहेब असते तर शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता”

मुंबई | Abhijeet Bichukale on Eknath Shinde | सोमवारी विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर (Legislative Council Elections) शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत. ते शिवसेनेच्या 12 पेक्षा जास्त आमदारांना घेऊन गुजरातला गेले असल्याची माहिती आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आलेला दिसत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकीय नेत्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यावर राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. अशातच बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आळंदी येथे माध्यमांशी बोलताना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
आता सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत. लोकांना जगणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे राजकारण करत आहेत. माझा शिवसेनेसोबत संबंध नाही. पण आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता. हे बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर मोठे झाले आहेत यामध्ये काही दुमत नाही, असं देखील अभिजीत बिचुकले म्हणाले.
यावेळी अभिजीत बिचुकले म्हणाले, मी श्रीहरी विष्णुचा मोठा भक्त आहे आणि विठुमाऊली विष्णुचे रुप आहे. शेकडो वर्षांची परंपरा असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी मी आलो आहे. संपूर्ण राज्यामध्ये पाऊस बऱ्यापैकी व्हावा यासाठी माऊलींकडे प्रार्थना करेन,” असं अभिजीत बिचुकले म्हणाले.