ताज्या बातम्या

थंडीत अभ्यंगस्नानाने शरीराला करा रीलॅक्स

Abhyanga Snan : अभ्यंग स्नान हा दिवाळीतील एक महत्त्वाचा संस्कार असला तरी थंडीत एकुणातच शरीराला तेलाचा मसाज जरूर करावा. कारण या दिवसात त्वचा कोरडी पडते. आयुर्वेदानुसार त्वचा ही पंचमहाभुतांमधील वायूपासून बनलेली असते. म्हणजेच त्वचेत वायूचे अधिक्य असल्याचे मानले जाते. वायू कमी करण्यासाठी स्नेह, स्निग्धता महत्त्वाची असते. त्यामुळे शरीराला हिवाळ्यात तेल लावणे गरजेचे. अभ्यंगामुळे शरीर रीलॅक्स्ड होते, मन उल्हसित होते आणि उत्साह वाढतो. त्यामुळे थंडीच्या काळात शक्य तितक्या वेळा अभ्यंग स्नान करायला हवे.  

थंडीत अभ्यंगस्नान का करावे ?

पावसाळ्यानंतर येणारी ऑक्टोबर हिट संपून थंडी चालू होण्याचा कालावधी म्हणजे हिवाळा ऋतू. थंडी ऐन दिवाळीत पडत असल्याने दिवाळी आणि थंडीचे अतूट नाते आहे. शिशिरात थंडीची तीव्रता खूप जास्त असते. थंडी सुरु होते, वाढत जाते तसतसे हवामान बदलत जाते. नुसती थंडी वाढत नाही तर हवेतला कोरडेपणा वाढायला लागतो. हवेत कोरडेपणा वाढतो तसाच तो आपल्या शरीरात आणि त्वचेतही वाढतो. उन्हाळ्यात ज्याप्रमाणे शरीराला द्रव पदार्थ आणि पाण्याची जास्त प्रमाणात गरज असते त्याचप्रमाणे थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी पडत असल्याने आहारविहारात बदल करणं अपेक्षित असते.

त्वचेचा कोरडेपणा कमी करणं आणि त्याची स्निग्धता वाढवण्यासाठी त्वचेला अभ्यंगाची गरज असते. म्हणूनच अभ्यंग स्नानात त्वचेला खोबऱ्याच्या, तिळाच्या किंवा बदामाच्या तेलाने मसाज केला जातो. हे तेल अंगात मुरले की त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. त्यानंतर उटणे लावून गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेतील स्निग्धता टिकून राहण्यास मदत होते. उटण्यातील औषधी वनस्पती त्वचेसाठी उपयुक्त असतात. तेल लावून उटण्याने आंघोळ केल्याने त्वचेच्या कोरडेपणा तर कमी होतोच पण त्वचेला खाज येणं, पुरळ, रॅशेस हे त्रास कमी होण्यासही मदत होते.  

अभ्यंगस्नानासाठी कोणते तेल वापरावे ?

image 1 3

अभ्यंगस्नानासाठी वेगवेगळ्या तेलांचा वापर केला जातो. आर्युवेदाप्रमाणे तेल शरीरात जिरवणे आणि उटणे लावून अंगाची स्वच्छता करणे, गरम पाण्याने आंघोळ करणे याला अभ्यंगस्नान असे म्हणतात.अभ्यंगस्नानाची पद्धत ही दर मैलावर बदलत असली तरी देखील त्याचा उद्देश हा शरीराचे शुद्धीकरण करणे असा होतो. अभ्यंगस्नानासाठी आवडीनुसार वेगवेगळ्या तेलांचा वापर केला जातो. तसेच प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतींच्या तेलाचा वापर केला जातो. काही ठिकाणी तिळाचे तेल, काही ठिकाणी खोबऱ्याचे तेल अशा तेलांचा वापर शरीरासाठी केला जातो. वेगवेगळ्या भागानुसार अभ्यंगस्नानाच्या पद्धती बदलत असल्या, त्याचे घटक बदलत असले तरीदेखील त्याचे फायदे तितकेच वाढत राहतात. असे असले तरीही अभ्यंगस्नानासाठी तिळाचे तेल वापरणे हे अधिक जास्त फायदेशीर ठरते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये