भारत-पाकिस्तान महामुकाबला पुन्हा रंगणार; जाणून घ्या केव्हा, कुठे, कोणता सामना?
ACC U19 Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याची बातमी ऐकून क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना पाहायला मिळाला. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एकतर्फी हा सामना जिंकला होता. आता पुन्हा, १० डिसेंबरला म्हणजे तीन दिवसांनंतर भारत-पाकिस्तान आमनेसामने येतील असे म्हटले तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे.
पुरुष अंडर-१९ आशिया चषकाला शुक्रवार, ८ डिसेंबरपासून सुरू होत आहे, ज्यामध्ये रविवारी, १० डिसेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना पाहायला मिळणार आहे. उदय सहारन या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईतील आयसीसी अॅकॅडमी ओव्हलवरील पहिल्या क्रमांकाच्या मैदानावर होणार आहे.
आठ संघांच्या अंडर-१९ आशिया चषकामध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि जपान या संघांचा समावेश आहे.
अंडर-१९ आशिया कपसाठी भारतीय संघ
उदय सहारन (कर्णधार), सौमी कुमार पांडे (उपकर्णधार), अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन दास, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, धनुष गौडा, अविनाश राव (यष्टीरक्षक), एम अभिषेक, इनेश महाजन (यष्टीरक्षक), आराध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.