पर्वती पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या एका ४७ वर्षीय आरोपीचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला. अटक केल्यानंतर त्याच्या पोटात दुखत असल्याने ससून रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. सचिन अशोक गायकवाड (वय ४७ ) असे मृत्यू झालेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे.
पर्वती पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका चोरीच्या गुन्हा पोलिसांनी दोघांना ७ ऑगस्ट रोजी अटक केली होती. सचिन अशोक गायकवाड आणि मनोहर अशोक माने अशी त्यांची नावे आहेत. अटक केल्यानंतर दोघांना कोर्टासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
९ ऑगस्ट रोजी आरोपी सचिन गायकवाड हा विश्रामबाग लॉकअपमध्ये असताना अचानक त्याला चक्कर आली. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात नेण्यात आले. सेरेब्रल हॅमरेज आजार असल्यामुळे त्याच्यावर ससून रुग्णालयात शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडी कडे सोपवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.