खळबळजनक! दोन कोटी अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आरोपीचे ससूनमधून पलायन
पुणे | Pune Crime – येरवडा जेलमधून उपचारासाठी ससून हॉस्पीटलच्या (Sassoon Hospital) वॉर्ड नंबर 16 मध्ये दाखल झालेल्या आरोपीने सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पलायन केले असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी ससून हॉस्पीटलच्या गेटवर तब्बल 2 कोटी रूपयांचे अंमली पदार्थ जप्त केले होते. त्यामुळे ससून हॉस्पीटलमधील भोंगळ कारभार चव्हाटयावर आला होता. वॉर्ड नं. 16 मध्ये येरवडा जेलमधून उपचारासाठी ससूनमध्ये आलेल्या बंद्यांवर उपचार केले जातात. त्यापैकी एका आरोपीने पलायन केल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपी ललित अनिल पाटील (34) यानं पोलिसांना चकवा देत हॉस्पीटलमधून पलान केलं. सोमवारी रात्री आठ वाजता आरोपी ललितला एक्स रे काढण्यासाठी नेलं जात होतं. त्यावेळी आरोपीनं तेथून पलायन केले. हॉस्पीटलमध्ये पोलिसांचा बंदोबस्त असताना देखील आरोपीनं पलायन कसं केलं, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. तर आता पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
दरम्यान, आरोपी ललित पाटील हा रूग्णालयाच्या कॅन्टीनमधील कामगार सुभाष जानकी मंडल आणि रौफ रहीम शेख यांच्या मदतीनं मेफेड्रॉन अमली पदार्थांची विक्री करत होता. या प्रकरणी पोलिसांनी शनिवारी सुभाष मंडल आणि रौफ शेखला अटक केली होती.