वाहनचालकांनो सावधान…! आर्टिफिशियल यंत्रणेची राहणार ‘नजर’
अत्याधुनिक व स्वयंचलित आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यंत्रणा बसविलेली ६९ वेगवान वाहने राज्याच्या परिवहन विभागात दाखल झाली आहेत. त्यातील चार वाहने पुणे प्रादेशिक परिवहन विभागाला मिळाली आहेत. याद्वारे नव्या वाहनांमध्ये बसविलेल्या रडारबेस यंत्रणेद्वारे नियमभंग करणार्या वाहनचालकाची स्वयंचलित पद्धतीने छायाचित्रे घेतली जाणार असून, या यंत्रणेद्वारे त्याचे चलनही संबंधित वाहनधारकाला स्वयंचलित पद्धतीनेच पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक नियमभंगाचे प्रकार कमी होऊन वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.एमएच १२ च्या कार्यक्षेत्रात संचार करणार्या या चार गाड्यांची पूजा येथील वरिष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत नुकतीच करण्यात आली.
या गाड्यांवर लवकरच व्हेईकल टॉप माउंटेड रडारबेस सिस्टिम बसविण्यात येणार असून, ती बसवून झाल्यानंतर या चार गाड्या पुणे जिल्ह्यात वाहतुकीचा सर्वाधिक ताण असलेल्या तसेच नियमांचे सर्रास उल्लंघन होत असलेल्या ठिकाणी निगरानी ठेवून वाहतूक नियमनाचे काम करणार आहेत, अशी माहिती येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी दिली.
अमेरिकेत प्रवास करताना वाहनचालक गाडीतील नेव्हिगेशन यंत्रणेद्वारे कॉपची गाडी कोठे आहे, याचा सतत मागोवा घेत असतात आणि ती जवळपास आल्याचे लक्षात येताच वाहनाच्या वेगमर्यादेसह वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करत वाहन चालवितात, असा अनुभव आहे. अमेरिकन कॉपच्या या गाडीत वेगमर्यादा तपासणार्या स्पीडगनसह अत्याधुनिक निगरानी यंत्रणा बसविलेली असल्याने वाहनचालकाने केलेल्या नियमभंगाची लागलीच नोंद केली जाते व संबंधित वाहनधारकाला क्षणार्धात त्याबाबतच्या दंडाचा भरणा करावा, असे तिकीट स्वयंचलित पद्धतीने पाठविले जाते.
त्यामुळे अमेरिकन वाहनचालक कॉपच्या या वाहनांना दबकून असतात. काहीशी अशाच प्रकारची रडारबेस यंत्रणा प्रादेशिक परिवहन विभागाला मिळालेल्या या नव्या वाहनांमध्ये बसविली जाणार आहे. त्यामुळे आरटीओच्या वायुवेग पथकातील या रडारबेस वाहनांचाही धाक निर्माण होईल व वाहनचालक नियमांचे पालन करू लागतील, असेही भोसले यांनी स्पष्ट केले.