अजित पवार गटाच्या अडचणीत वाढ? शरद पवार गटाची मोठी रणनीती; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
नवी दिल्ली | Sharad Pawar Group – आज (6 ऑक्टोबर) राष्ट्रवादी (NCP) पक्ष कुणाचा? पक्षाचं नाव कुणाचं? चिन्ह कुणाचं? या प्रकरणावर केंद्रीय निवडणूक आयोगात प्रत्यक्ष सुनावणी पार पडत आहे. तर या प्रत्यक्ष सुनावणीच्या पहिल्याच दिवशी शरद पवार गटानं (Sharad Pawar Group) मोठी रणनीती आखली आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटाच्या आमदारांना अडचणीत आणण्यासाठी शरद पवार गटानं मोठी खेळी खेळली आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारी याचिका शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दाखल केली आहे. ही याचिका जयंत पाटील यांनी थेट कोर्टात दाखल केली आहे. त्यामुळे अजित पवार गट अडचणीत येण्याची शक्यता आहे.
दोन महिन्यांपूर्वी अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांना 40 आमदारांनी पाठिंबा दिला असल्याचा दावा केला जात आहे. तर याप्रकरणी शरद पवार गटाकडून जयंत पाटलांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे याचिका दाखल केली आहे.