मुंबई : (Actor Vikram Gokhale Cinema ‘Sur Lagu de’ Poster Release) काही कलाकार आपल्या उपस्थितीनं वातावरणात नवचैतन्य निर्माण करतात, पण काही अनुपस्थितीतही आपली उणीव भासू देत नाहीत. ते गेले तरी त्यांचं काम कायम बोलतं रहातं. असाच काहीसा अनुभव सध्या मनोरंजन विश्व घेत आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मनाला चटका लावणारी एक्झीट घेतली आणि संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली.
विक्रम गोखले यांनी जरी जीवनयात्रा संपवली असली तरी चित्रपटरूपात ते कायम रसिकांसोबत राहणार आहेत. याच शोकाकूल वातावरणात सिनेरसिकांना दिलासा देणारी बातमी म्हणजे त्यांनी अभिनय केलेला ‘सूर लागू दे’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर ‘सूर लागू दे’च्या पोस्टरला नेटकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
निर्माते अभिषेक ‘किंग’ कुमार आणि नितीन उपाध्याय यांनी ऑडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली ‘सूर लागू दे’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रवीण विजया एकनाथ बिरजे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पिकल एंटरटेन्मेंटचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी या चित्रपटाच्या वितरणाचं काम पाहत आहेत. ‘सूर लागू दे’ या चित्रपटाच्या शीर्षकातच संगीताचा ताल दडलेला आहे.